मुंबई- राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या सत्तास्थापनेची घोषणा ही उद्या(मंगळवारी) दिल्लीतूनच होईल. त्यासाठी उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्लीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आज दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट झाली. मात्र, या भेटीत नेमका काय निर्णय झाला, हे अद्याप बाहेर आले नाही. त्यातच पवार यांनी या बैठकीत काही झाले नसल्याचे सांगून सर्वांची भंबेरी उडवून दिली. तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उद्या दिल्लीत भेटणार आहे. तर, या भेटीदरम्यान होणाऱ्या बैठकीत राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा अंतिम निर्णय होईल आणि त्यानंतर राज्यात सर्व घडामोडींना वेग येईल, असे मलिक यांनी सांगितले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आपण एनडीएमधून बाहेर पडलो असलो तरी यूपीएत गेलो नाही, असे म्हटले आहे. त्यावर मलिक म्हणाले की, शिवसेनेने निवडणुकीपूर्वी भाजपसोबत युती केली होती, ते केंद्रात एनडीएमध्ये होते. मात्र, आता त्यांचे एनडीएसोबत संबंध तुटल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात ते आमच्यासोबत आले तर ते आमच्या आघाडीचा भाग होऊ शकतील, असे मलिक यांनी सांगितले.
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी सेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघेही पुढे असले तरी काँग्रेसकडून दिरंगाई होते आहे, असे बोलले जाते. यावर मलिक यांनी सांगितले की, यात दिरंगाई तशी दिसत नाही. मात्र, सर्वसमावेशक असा कार्यक्रम तयार करण्यासाठी वेळ लागला आहे. त्यात पाच वर्षे सरकार चालले पाहिजे यासाठी काँग्रेसला सत्तेत सहभागी व्हावे लागणार असल्याने वेळ लागत आहे. मात्र, आता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात हे उद्याच्या बैठकीत स्पष्ट होईल, असे मलिक यांनी सांगितले.
हेही वाचा-शिवसेनेबाबत सोनिया गांधींशी कोणतीही चर्चा झाली नाही - शरद पवार