मुंबई -जून महिना संपायला आला तरी मुंबईला पाणीपुरवठा ( Mumbai Water Supply ) करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ९.७६ टक्के पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पुढील दीड महिना मुंबईकरांची तहान भागवेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाचे उपायुक्त अशोक राठोड यांनी सांगितले.
दोन दिवसात पाणी कपातीचा निर्णय -हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. ११ जूनला पावसाला सुरुवात झाल्याचे हवामान विभागाने जाहीरही केले. मात्र त्यानंतर मुंबईत किंवा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी एखाद दुसरी पावसाची सर येवून जात आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. गेल्या वर्षी सातही धरणात २,२१,८९० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होता. यंदा १ लाख ६० हजार ८३१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. मागील वर्षापेक्षा ८० हजार ६४८ दशलक्ष लिटर पाणी साठा कमी आहे. जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा सातही धरणात उपलब्ध आहे. पुढील १५ ते २० दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईत पाणी कपात करावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या २ दिवसात घेतला जाईल असे अशोक राठोड यांनी सांगितले.
वर्षाला इतके लागते पाणी -अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र २३ जून २०२२ रोजी सातही धरणात १ लाख ६० हजार ८३१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे.