महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय - वर्षा गायकवाड

शालेय शिक्षणमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेत राज्यातील शाळा १५ जूनला सुरू करण्यावर शिक्षणाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यामुळे या बैठकीत राज्यातील शाळा या प्रत्यक्षात भरविण्याऐवजी त्या ऑनलाईन अभ्यासक्रम देऊन सुरू केल्या जाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

By

Published : May 25, 2020, 10:50 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा सुरू करायच्या की नाही? याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी ऑनलाईन शिक्षणाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच या शाळा ऑनलाईन अभ्यासक्रमानेच (डिजीटल पद्धतीने) सुरू करण्यासाठी लवकरच निर्णय घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले. यासोबतच, विदर्भ वगळता इतर ग्रीन झोनमधील शाळा या १५ जूनपासून सुरू करण्याचा विचार असल्याची माहितीही गायकवाड यांनी दिली.

शालेय शिक्षणमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे बैठक घेत राज्यातील शाळा १५ जूनला सुरू करण्यावर शिक्षणाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. त्यामुळे या बैठकीत राज्यातील शाळा या प्रत्यक्षात भरविण्याऐवजी त्या ऑनलाईन अभ्यासक्रम देऊन सुरू केल्या जाव्यात याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही. त्यासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन अभ्यासक्रम आणि त्यासाठीची लागणारी तयारी मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याचे शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्राकडून सांगण्यात येते.

राज्यातील बहुतांश महापालिका आणि इतर अनेक शहरांमध्ये कोरोनाने परिस्थिती भयंकर बनली आहे. पुढील अनेक महिने या शाळा सुरू होतील की, नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. दरम्यान, कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली तर या शाळा कशा सुरू करता येतील? यावर बराच वेळ विचारमंथन झाले. मात्र, शाळा सुरू करणे धोक्याचे ठरणार असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले, तर अनेकांनी आपल्याकडे शाळा सुरू करण्याची तयारीही असल्याचे अभिप्राय दिले. त्यानंतर प्रत्यक्षात शाळा १५ जूनला भरविण्याचा विचार लांबणीवर पडणार असल्याचे सांगण्यात आले.

शाळा सुरू करण्यासाठी परिस्थितीचा आढावा-

राज्यातील रेड झोनमधील महापालिका क्षेत्रातील शाळा या ऑनलाईन अभ्यासक्रमाने सुरू कराव्यात आणि इतर काही ठिकाणी प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यासाठी काय परिस्थिती आहे? यासाठीची माहिती दोन दिवसांमध्ये कळविण्याचे आदेश ‍राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांत‍ शाळा या ऑनलाईन अभ्यासक्रमाने आणि प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी परिस्थिती लक्षात घेऊन त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्राकडून देण्यात आली.

शाळा सुरू करण्याची घाई नको -

मुंबई, पुणे आदी सर्वच महापालिकांमध्ये कोरोनामुळे परिस्थिती बिघडली आहे. अशात कोणत्याही प्रकारे शाळा सुरू करणे शक्य होणार नाही. यामुळे किमान परिस्थिती आटोक्यात येईपर्यंत शिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याची घाई करू नये, अशी मागणी आपण केली असल्याचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दूरध्वनीवरून सांगितले. तसेच मुंबईत कोणत्याही स्थितीत शाळा सुरू करणे शक्य नाही. तशीच स्थिती राज्यातील अनेक शहरांमध्ये बनली आहे. त्यातच आजमितीला ६० टक्केहून अधिक शिक्षक हे कोरोनासाठी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कर्तव्यावर आहेत. त्यामुळे अशा स्थितीत काही दिवस थांबल्याने कोणतेही नुकसान होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details