मुंबई Online Attendance :महाराष्ट्र सरकारनं राज्यातील सर्व लाख शाळांमध्ये ऑनलाइन उपस्थिती नोंदणीबाबत निर्णय जारी केला आहे. ही नोंदणी अटेंडन्स बॉट म्हणजेच चॅटबॉटच्या स्वरूपात केली जाईल. पण महाराष्ट्रातील हजारो शाळांमध्ये वीज नाही, संगणक, इंटरनेटची उपलब्धता नसताना ऑनलाइन हजेरी नोंदवायची कशी, असा प्रश्न शिक्षकांना पडलाय.
हजेरी ऑनलाइन चॅटबॉट पद्धतीनं सुरू :महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागांतर्गत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 1 डिसेंबर 2023 पासून राज्यातील इयत्ता 1 ली ते 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाइन चॅटबॉट पद्धतीनं सुरू करण्यात येणार आहे. राज्यात एकूण 1 लाख 9 हजार 605 शाळा आहेत. या शाळात दोन कोटी 25 लाख 86 हजार 695 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
दोन सत्रात शिक्षकांनी नोंदणी करायची :कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदणीमध्ये आता शिक्षकांना कामाला जुंपणार आहे. शिक्षकांना आता विद्यार्थ्यांची ऑनलाइन उपस्थिती नोंदवावी लागणार आहे. त्यामध्ये शाळेचा U DICE कोड तसंच शाळेचा ID कोड त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे. तसंच शालार्थ पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक दिलेला असेल तोच क्रमांक तिथं टाकवा लागणार आहे. शिक्षकांना सकाळ तसंच दुपार अशा दोन सत्रात ही नोंदणी करायची आहे. यावर जिल्हा नोडल अधिकारी देखरेख ठेवणार आहेत.
27 हजार सरकारी शाळांमध्ये वीज नाही :राज्यात सध्या 65 हजार 639 शाळा आहेत. भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या 2022 UDISEPlus अहवालात त्यापैकी 42% म्हणजेच 27 हजार 425 शाळांमध्ये वीज उपलब्ध नाहीये. केवळ 38 हजार 214 सरकारी शाळाचं म्हणजे 58% विद्युतीकरण झालं आहे, तर खासगी अनुदानित शाळांची एकूण संख्या 24 हजार 27 आहे. त्यापैकी 3 हजार 352 म्हणजेच 11% शाळांना वीज मिळत नाहीये. तसंच, 19 हजार 268 खासगी विनाअनुदानित शाळा असून त्यापैकी दहा टक्के म्हणजे 1 हजार 180 शाळांमध्ये वीज नाही. इतर 606 गैर-मान्यताप्राप्त खासगी शाळांपैकी निम्म्याहून अधिक शाळांमध्ये वीज नाही.