महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील भाजप नेत्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण सुरू - राजकीय विश्लेषक - Pravin Darekar

माजी मंत्री विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना पक्षात केंद्रीय स्तरावर महत्त्वाची पदे दिली जात आहेत. तर गडकरी गटाचे ओळखले जाणारे बावनकुळे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व बाबी भाजपातील अधिकारांचे विकेंद्रीकरण दर्शवणाऱ्या असल्याचे जाणकारांचे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे. मात्र, पक्षातील नेत्यांनी याबाबत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Nov 22, 2021, 6:55 PM IST

Updated : Nov 22, 2021, 7:25 PM IST

मुंबई -माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते विनोद तावडे (Vinod Tawde) यांना केंद्रीय स्तरावर पक्षाचे राष्ट्रीय सचिव ही जबाबदारी देण्यात येत आहे. तसेच माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनाही केंद्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतीच दिली आहे. दरम्यान, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना विधान परिषदेतील उमेदवारी दिली गेल्याने गडकरी गटाचे वर्चस्व दिसून येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भाजपमधील अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जात असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.

बोलताना राजकीय विश्लेषक

दुसऱ्या फळीतील नेत्यांना मजबूत करण्याचा पक्षाचा प्रयत्न

गेल्या काही वर्षात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच भोवती पक्षाचे आणि राज्याचे राजकारण होते. फडणवीस यांच्या मताला अनन्यसाधारण महत्त्व होते. मात्र, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांना केंद्रीय स्तरावर स्थान देऊन पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना मजबूत करण्याचा आणि अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा हा पक्षाचा प्रयत्न असल्याचे जाणकारांना वाटत आहे. फडणवीस यांचे अधिकार काढून घेतले गेले नसले तरी ते निश्चितच कमी होताना दिसत आहेत, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

केंद्रीय मंत्री गडकरी व विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या उपस्थितीत चंद्रशेखर बावनकुळे यांनी भरला अर्ज

विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे यांच्यासह नागपूर शहरातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे बावनकुळे यांना स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी सलग दोन वर्षे संघर्ष करावा लागला आहे. त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. बावनकुळे विरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार रवींद्र उर्फ छोटू भोयर काँग्रेसकडून अर्ज दाखल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक आणखीच रंजक होणार आहे.

पक्षाचे बळकटीकरण, अधिकार कमी नाहीत - दरेकर

दरम्यान, केंद्रीय स्तरावर महाराष्ट्रातील नेत्यांची घेतली गेलेली ही दखल आहे. यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना योग्य स्थान मिळाले असून त्याचा राज्यातील राजकारणाला आणि पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी फायदाच होईल. मात्र, यामुळे कुणाचेही अधिकार कमी करण्याचा प्रश्न येत नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा -Vidhan Parishad Election : 'चंद्रशेखर बावनकुळेंचा पराभव होणार' भाजप नेते छोटू भोयर यांचा दावा

Last Updated : Nov 22, 2021, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details