मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्ण संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. ६ ते ९ हजाराच्या घरात रोज रुग्ण आढळून येत आहेत. तर मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाच दिवसांपूर्वी मृत्यूदर २.०१ टक्के इतका होता तो आता २.०३ टक्के इतका झाला आहे. राज्यात ८ जिह्यात बाधितांचे प्रमाण अजूनही पाच टक्क्यांवर असून तेथे चिंताजनक स्थिती कायम आहे.
रुग्ण संख्येत चढउतार
मुंबईत ९ जुलैला ८ हजार ९९२ नवीन रुग्ण आढळून आले असून २०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ८ जुलैला ९ हजार ११४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ७ जुलैला ९ हजार ५५८ नवे रुग्ण आढळून आले असून १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६ जुलैला ८ हजार ४१८ नवे रुग्ण आढळून आले असून १७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५ जुलैला ६ हजार ७४० नवे रुग्ण आढळून आले असून ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ जुलैला ९ हजार ३३६ नवे रुग्ण आढळून आले असून १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४ व ५ जुलैला मृत्यू दर २.०१ टक्के इतका होता. ६ व ८ जुलैला मृत्यू दर २.०२ टक्के इतका झाला तर ९ जुलैला मृत्यू दरात वाढ होऊन तो २.०३ टक्के इतका झाला आहे.
८ जिल्ह्यांत चिंताजनक स्थिती
आठ जिल्ह्यांत बाधितांचे प्रमाण अजूनही पाच टक्क्यांवर असून तेथे चिंताजनक स्थिती कायम आहे. राज्यात सर्वाधिक १०.२४ टक्के बाधितांचे प्रमाण कोल्हापुरात आहे. त्या खालोखाल सातारा (९.१४ टक्के), सांगली (८.८१ टक्के), रायगड (७.८८ टक्के), पुणे (७.६८ टक्के), रत्नागिरी (७.२९ टक्के), सिंधुदुर्ग (६.५५ टक्के), पालघर (५.२६ टक्के) आणि बुलढाणा (४.५७ टक्के) या जिल्ह्यांमध्ये बाधितांचे प्रमाण अधिक आहे.कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांतील संसर्ग दर जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही प्रमाणात घटला होता. परंतु २७ ते ३ जुलै या आठवड्यात मात्र पुन्हा वाढला. कोल्हापूर आणि साताऱ्यातील बाधितांचे प्रमाण या आठवड्यात अनुक्रमे तीन आणि दोन टक्क्यांनी वाढल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.