मुंबई Death Threats To Celebrities :बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खाननं यावर्षी पठाण आणि जवान या दोन चित्रपटांतून जोरदार कमबॅक केला. त्याच्या या चित्रपटांनी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या घवघवीत यशानंतर किंग खान आता गँगस्टरच्या निशाण्यावर आलाय. शाहरुख खानच्या जीविताला धोका असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली असून त्यानंतर त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला 'वाय प्लस' सुरक्षा पुरवली आहे.
सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ :प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येप्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेल्या गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईनं काही दिवसांपूर्वी अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करत त्याला 'वाय प्लस' सुरक्षा पुरवली. सलमान खानच्या कर्मचाऱ्याला एक मेल प्राप्त झाला होता. त्या मेलमध्ये सलमान खानचा 'मुसेवाला' करू अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत लगेच वाढ केली.
या सेलिब्रिटींना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे : 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि 'द केरला स्टोरीज' या चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'द केरला स्टोरीज' या चित्रपटाच्या क्रू मेंबर्सना देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर चित्रपटाची अभिनेत्री अदा शर्मा हिच्यासह क्रू मेंबर्सच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. बीग बी अमिताभ बच्चन यांना मुंबई पोलिसांकडून 'एक्सट दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत इस्रायलच्या खाजगी एजन्सीची सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेसाठी ५५ लोकांचा ताफा आहे.
सुरक्षेसाठी शुल्क भरावं लागतं का? : सिक्युरिटी अँड प्रोटेक्शन विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार जिवाला धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षा कवच पुरवलं जातं. ज्यांच्या जीवाला धोका आहे, त्यांना राज्य सरकारकडून नि:शुल्क सुरक्षा पुरवली जाते. मात्र काही नागरिकांना सुरक्षेसाठी शुल्क भरावं लागतं किंवा सुरक्षा रक्कम जमा करावी लागते. हे शुल्क त्या व्यक्तीच्या उत्पन्नावर अवलंबून असतं.