मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना जिवे मारण्याच्या धमकीचे लॉरेन्स बिश्नोई गॅंगशी कनेक्शन नसल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र त्याने इंटरनेटवर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्याबाबत सर्च केले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी दिली आहे.
कोणत्याही पक्षाशी संबंध नाही : खासदार संजय राऊत यांना 31 मार्चला जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी कांजूर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर कांजूरमार्ग पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून 23 वर्षीय आरोपी राहुल तळेकर याला पुण्यातून अटक केली होती. न्यायालयाने त्याला 5 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. सध्या तो जामिनावर सुटला आहे. आरोपी राहुल तळेकर याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे पोलीसांनी म्हटले आहे.
दारूच्या नशेत दिली धमकी : राहुल तळेकर हा मूळचा जालन्याचा रहिवासी असून तो पुण्यात वडगाव शेरी येथे एक छोटे हॉटेल चालवतो. त्याने संजय राऊत यांची एक बातमी टिव्हीवर बघितली होती. त्यानंतर हॉटेलचे वेटर आणि आचाऱ्यांसोबत दारूच्या नशेत त्याने लॉरेन्स बिश्नोईचे व्हिडिओ बघितले व इंटरनेट वरून संजय राऊत यांचा क्रमांक शोधून त्यांना जिवे मारण्याचा धमकी देणारा एसएमएस केल्याचे त्याने पोलिसांकडे कबूल केले आहे.
आरोपीची जामिनावर सुटका : राहुल तळेकरची इंटरनेट हिस्टरी चेक केली असता त्याने युट्युबवर मुसेवाला आणि लॉरेन्स बिश्नोई यांचे व्हिडिओ पाहिले होते. याप्रकरणी त्याची सखोल चौकशी केली असता त्याचा लॉरेन्स गॅंगशी कुठलाही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी राहुल तळेकर याने एसएमएस मध्ये उल्लेख केलेली एके - 47 कधीच पाहिली नसल्याचे म्हटले आहे. पोलीस आयुक्त पुरुषोत्तम कराड यांनी पुढे अधिक देताना सांगितले की, न्यायालयाने आरोपी राहुल तळेकर याला 5 एप्रिलला जामीन मंजूर केला होता. मात्र त्याच्या कागदपत्रांची पूर्तता शिल्लक असल्याने त्याची आज ठाणे जेल मधून सुटका झाली.
हेही वाचा :CM Flags Off Special Train to Ayodhya : एकनाथ शिंदेंचा अयोध्या दौरा, ठाण्याहून तीन हजार शिवसैनिक अयोध्येला रवाना