Amnesia And Deafness: ब्लूटूथ वापरत आहात, तर सावधान! स्मृतीभंश आणि बहिरेपणाला पडू शकता बळी - बहिरेपणात वाढ
वाहनांचे कर्णकर्कश आवाज, स्पीकर, ध्वनी प्रदूषण आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बहिरेपणात वाढ झाली आहे. मोबाईलवर गाणी ऐकण्यासाठी देखील सध्या ब्लूटूथ सर्रास वापरले जाते. मात्र, यामुळे बहिरेपणा वाढला आहे. स्मृतीभ्रंश होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सुमारे दोन अब्ज लोकांना बहिरेपणा आला आहे. तर मुंबईत १०० जणांपैकी १० जण उपचार घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्मृतिभ्रंश आणि बहिरेपणा
By
Published : May 7, 2023, 11:18 AM IST
कानावर सतत आदळणारा मोठा आवाज ऐकण्याची क्षमता कमी होण्याचे कारण- डॉ. रचना मेहता श्रॉफ
मुंबई :तंत्रज्ञानामुळे आपले जीवन खूप सोयीचे झाले आहे. आज काही क्षणात दूर असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क करणे, बोलणे संभव आहे. तसेच मोबाईलच्या माध्यमातून अनेक मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. दुचाकी वाहने, चारचाकी वाहने यामुळे वाहतूक सोयीची झाली आहे. परंतु या सर्वातून माणसांचे जीवन जगणे जरी सोपे झाले असले तरी यातून हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण यासारख्या अनेक समस्या देखील निर्माण झाल्या आहेत. ध्वनी प्रदुषण हे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे सर्वात घातक प्रदूषण आहे. अगदी कमी वयापासूनच श्रवणाच्या समस्या यामुळे जाणवत आहेत.
श्रवणशक्ती चांगली ठेवण्यासाठी उपाय
नुकत्याच जाहीर केलेल्या लंडन येथील बायो बँकच्या अहवालानुसार श्रवणशक्ती कमी झाल्यामुळे वयाच्या साठीमध्येच स्मृतिभंशाचा आजार होऊ शकतो. कर्णकर्कश आवाज, वृद्धत्व, विविध आजार तसेच अनुवांशिकता यामुळे ऐकू न येणे ही एक सामान्य समस्या आहे. सुमारे एक तृतीयांश वृद्धांची श्रवणशक्ती वयोमानानुसार कमी होते. भारतामध्ये कानावर सतत आदळणारा मोठा आवाज ऐकण्याची क्षमता कमी होण्याचे सर्वात मोठे कारण असल्याची माहिती अपेक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या ईएनटी तज्ञ आणि ऑटो रहिनोलरींगो लॉजिस्ट डॉ. रचना मेहता श्रॉफ यांनी दिली.
'असा' होतो त्रास :योग्यरित्या ऐकू न येण्याची क्षमता देखील स्मृतिभ्रंश या आजाराशी जोडलेली आहे. श्रवणशक्ती हा घटक आपल्या स्मृतीशी जोडलेला असतो. आपला मेंदू आठवणी तयार करण्यासाठी आणि पुनर्प्राप्त करण्यासाठी श्रवणविषयक माहितीवर अवलंबून असतो. श्रवण कमी होणे, या प्रक्रियेत व्यत्यय आणू शकते. स्मरणशक्तीच्या कार्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. बहिरेपणा येणे, मानसिक स्थिती बिघडणे, चिडचिड होणे यासारखे आजार जडत आहेत.
आहारात 'अ' जीवनसत्व वाढवा :अनेकजण श्रवणशक्ती कमी झाल्यावर डॉक्टरांचा सल्ला घेत नाही. त्यामुळे पुढील ४ ते ५ वर्षात त्यांची श्रवणशक्ती पूर्णपणे निघून जाते. मुंबईसारख्या शहरामध्ये १०० पैकी फक्त १० नागरिक करतात बहिरेपणाच्या आजारावर उपचार करत असल्याचे समोर आले आहे. श्रवणशक्ती चांगली ठेवण्यासाठी फोन, रेडिओ, टीव्हीचा आवाज कमी ठेवा. फोनवर बोलताना मोबाईल रेडिएशन टाळण्यासाठी वापरात नसेल तर इंटरनेट बंद ठेवा. ब्लू टूथ गरजेपुरते वापरा. आसपासचे नैसर्गिक आवाज ऐका. गोंगाटात जास्त वावरु नका. मोठ्या आवाजात काम करावे लागत असेल तर आहारात जीवनसत्व 'अ' चे प्रमाण वाढवा, असे आवाहन आरोग्य चिकित्सकांकडून करण्यात येत आहे.
स्मृतीभ्रंशाच्या संख्येत लक्षणीय वाढ :जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भविष्यात जवळपास २.५ अब्ज लोकांना काही प्रमाणात श्रवणशक्ती कमी होण्याचा अंदाज आहे. तर किमान ७०० दशलक्ष लोकांना २०५० पर्यंत श्रवण पुनर्वसन आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार, अनेक लोकांना ऐकू येण्याची शक्यता कमी होऊ लागली आहे. श्रवणशक्ती कमी होणे म्हणजे स्मृतिभ्रंश होण्याच्या घटकांपैकी एक आहे. स्मृतिभ्रंशाच्या सुमारे १० लाख नवीन प्रकरणांपैकी ८ लाख प्रकरणात बहिरेपणा कारणीभूत ठरतो आहे असे, लॅन्सेटच्या २०२० च्या वृद्धत्वावरील संशोधनात नमूद केले आहे.