मुंबई :वांद्रे येथील पाली नाका परिसरात असलेल्या पापा पांचो दा ढाब्यामध्ये चिकनच्या थाळीमध्ये चक्क मृत उंदराचे पिल्लू आढळल्याचा किळसवाणा प्रकार घडला आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी ढाब्याचा व्यवस्थापक, कुक आणि चिकन पुरवठा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संविधान 272, 336 आणि 34 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी दिली आहे. याप्रकरणी हॉटेलचे दोन कुक आणि मॅनेजर यांना अटक करण्यात आली असून त्यांची जामीनावर सुटका देखील झाली आहे. तक्रारदार अनुराग सिंह (४०) मुळचे मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. कामानिमित्त सध्या गोरेगाव येथे राहत आहेत. ते बँकेत व्यवस्थापक पदावर कामाला आहेत. ते वांद्रे येथील एका प्रसिद्ध ढाब्यावर मित्रासोबत जेवण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मटण, चिकन करीची थाळी मागविली.
व्यवस्थापकाची उडवाउडवीची उत्तरे :जेवत असताना त्यांच्या चिकनच्या थाळीमध्ये उंदराचे मृत पिल्लू आढळले. त्यांनी ढाब्याचा व्यवस्थापक व्हिवियन अल्बर्ट सिकवेरा (४०) यांच्याकडे विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर सिंह यांनी याप्रकरणी वांद्रे पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तक्रारदारांना जेवणात मृत उंदीर देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ढाब्याचा मॅनेजर आणि कुकला अटक केली आहे.
भाजीत उंदराच्या मांसाचा तुकडा :वांद्रे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुराग दिलीप सिंग (वय 40) हे गोरेगाव पश्चिम येथील एका खासगी बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करतात. 13 ऑगस्टला ते वांद्रे येथील पापा पांचो दा ढाबा रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्यावेळी जेवणासाठी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र अमीन खान (वय 40) देखील होते. त्यांनी ऑर्डर केलेल्या चिकन डिशमध्ये उंदराचे पिल्लू आढळून आले. सुरुवातीला हे त्यांच्या लक्षात आले नाही आणि तो कोंबडीच्या मांसाचा तुकडा आहे असे वाटल्याने त्यांनी त्यातील काही भाग खाऊन देखील टाकला. मात्र, त्यानंतर जवळून पाहिल्यावर त्याच्या लक्षात आले की, ते उंदीराचे पिल्लू आहे.
मी ऑर्डर केलेल्या चिकन करीमध्ये मांसाचा तुकडा जास्त हलका दिसत होता. जेव्हा मी ते चमच्याने बाहेर काढले तेव्हा तो लहान उंदीर असल्याचे दिसून आले, असे तक्रारदार सिंग यांनी वांद्रे पोलिसांना सांगितले. आम्ही याची कर्मचाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी माफी मागितली; पण त्यानंतर पुढील 45 मिनिटे होऊनसुद्धा मॅनेजर समोर आला नाही. ताटात उंदीर सापडल्यानंतर मला कसेतरी वाटू लागले. कारण त्याचा काही भाग आधीच खाल्ला होता. घरी परतताना आम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी काही औषधे लिहून दिली आहेत. - अनुराग सिंग, तक्रारदार
चिकन पोहोचवणाऱ्याचा शोध सुरू :त्यानंतर अनुराग सिंग आणि त्यांच्या मित्राने हॉटेल मॅनेजर व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा (वय 40) यांना फोन करून बोलावून घेतले आणि त्यांना ताटातील उंदीर दाखवला. त्यावेळी व्यवस्थापक व्हिव्हियन अल्बर्ट सिक्वेरा समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी सिक्वेरा आणि दोन कुक असलेल्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. तिघांवर भारतीय दंड संहिता कलम 272 आणि 336, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर तिघांची जामिनावर सुटका करण्यात आली. वांद्रे पोलीस आता ढाब्यावर चिकन पोहचवणाऱ्याचा शोध घेत आहेत.