मुंबई -राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान आहेत. मात्र, महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि सरकारची धोरणे ठरवण्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरचष्मा राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये सरकारचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस समोर येत आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीसांचा वरचष्मा - उपमुख्यमंत्री सोबत असताना मुख्यमंत्र्यांची देहबोली सुद्धा खूप काही सांगून जाते. विविध कार्यक्रमांमध्ये उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री सोबत असताना अधिकारी आणि सनदी अधिकारी हे उपमुख्यमंत्र्यांनाच माहिती देत असताना पाहायला मिळते. मुख्यमंत्री केवळ त्यांच्यासोबत उभे राहतात आणि प्रसारमाध्यमांची बोलायला मुख्यमंत्र्यांना सांगितले जाते हे चित्र अनेक कार्यक्रमातून दिसते आहे.
मुख्यमंत्री शिंदेंना दाखवली जागा - सरकार स्थापन झालेल्या झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातातून माईक घेतल्याची प्रसार माध्यमांमध्ये आणि समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्याचवेळी राज्याची सूत्रे कुणाकडे असतील याबाबत सर्वत्र कुजबूज सुरू झाली होती त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा गुरुवारी मुंबईत आला.