प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाणार असून, अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत. तशी कल्पना अजित पवार यांना दिली असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
अजित पवार हे मुख्यमंत्री होणार या केवळ अफवा आहेत. त्यामुळे संभ्रम निर्माण करणारे विधाने थांबवावीत. सर्व गोष्टींची माहिती अजित पवार यांना आधीच दिलेली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री -अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या अफवा आहेत. मुख्यमंत्री बदलाची कोणतीही चर्चा नाही. त्यामुळे संभ्रम निर्माण करणे बंद करावे. अजित पवार यांना सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे. एकनाथ शिंदे हेच आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री असल्याचे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
समझनेवाले को इशारा काफी है - काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी १० ऑगस्टनंतर १६ आमदार अपात्र होतील व अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असे सांगितले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पृथ्वीराज बाबांनी याबाबत पतंगबाजी करणे बंद करावे. महायुतीचे जे लोक अशा पद्धतीच्या चर्चा करत आहेत त्यांना माझे स्पष्ट सांगणे आहे की त्यांनी अशा चर्चा बंद कराव्यात. यामुळे महायुतीत संभ्रम निर्माण होतो. बोलताना वास्तविकतेचे भान असणे फार गरजेचे आहे. अशा विधानांनी जनतेमध्ये संभ्रम निर्माण होतो. परंतु समझनेवाले को इशारा काफी है, असे सांगत या विषयावर विनाकारण राजकारण करणाऱ्यांना एक प्रकारे फडणवीस यांनी इशारा दिला आहे.
मंत्रिमंडळ विस्तार कधी - राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यापासूनच मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबतची चर्चा कायमच सुरू आहे. आता पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाणार आहे. त्याबाबतची तारीखही लवकरच जाहीर केली जाणार आहे.
अजित पवार भावी मुख्यमंत्री - अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन राज्यात खळबळ उडवून दिली होती. त्च्यांच्या बंडामुळे पक्षात उभी फूट पडली होती. आता मात्र अजित पवार लवकरच मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याच्या बातमीचे पिल्लू त्यांच्या समर्थकांनी सोडले आहे. अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द देऊनच भाजपाने सत्तेत सहभागी केल्याची चर्चा रंगली होती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावर 'जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख असलेले अजित पवार यांचे बॅनर दिसून आले होते.
मिटकरींचे ट्विट - अजित पवार यांना भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. या घटनाक्रमात अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटची भर पडली होती. आपल्या ट्विटमध्ये मिटकरी यांनीही 'मी अजित अनंतराव पवार मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की' असे ट्विट करत 'अजितपर्व' सुरू झाल्याचा दावा परस्पर करुन टाकला होता. त्यामुळे चर्चांना पुन्हा सुरुवात झाली होती.
हेही वाचा -
- Ajit Pawar : अजित पवार लवकरच होणार मुख्यमंत्री! अमोल मिटकरींचे ट्विट चर्चेत
- Maharashtra Politics: तिजोरीची चावी येताच अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांवर निधीचा वर्षाव, कुणाला किती मिळाला निधी?
- Maharashtra Politics : भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे झळकले बॅनर; शिंदे-पवार गटात तु तू मै मै