मुंबई :गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न हा ऐरणीवर आहे. अजूनही लाखो गिरणी कामगारांना घरे मिळालेली नाहीत. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नाबाबात विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पात्र उमेदवारांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येणार आहे. यासाठी छाननी समितीमार्फत छाननी प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच नवी यादी जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा फडणवीस यांनी केली. तर मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना जागांबाबत सविस्तर निरीक्षण करण्याची सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
सरकारचे लक्ष वेधले :आमदार सुनील राणे यांनी गिरणी कामगरांच्या घराच्या प्रश्नासंदर्भात शनिवारी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले. या लक्षवेधीला गृहनिर्माण मंत्री फडणवीस यांनी सभागृहात उत्तर दिले. दरम्यान, गिरणी कामगारांनी काही जागा निश्चित केल्या आहे. त्या जागांवर काही आरक्षण किंवा गावरान जमिन आहे का? हे तपासून पाहिले जाऊन लवकरच या जागाही निश्चित करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी यावेळी जाहीर केले. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, कालिदास कोंळबकर, सदा सरवणकर यांनी प्रश्न उपस्थित केले. गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नासाठी आमदार सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.