अजित पवारांचा वंदे भारत ट्रेनने प्रवास मुंबई - शनिवारी (15 जुलै) नाशिक येथे आयोजित 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वंदे भारत एक्सप्रेसने सकाळी नाशिककडे रवाना झाले. नेहमीप्रमाणे वृत्तपत्र वाचत अजित पवार यांचा प्रवास सुरु झाला. यावेळी रेल्वेमधील अनेक प्रवाशांनी अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला.
प्रवाशांसोबत संवाद -या प्रवासात सहप्रवासी असलेले एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी येऊन बसले. दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजित पवार म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर...अशीच जनतेची कामे करा, बेस्ट लक, अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीसुद्धा जे शक्य आहे, लोक हिताचे आहे ते करत राहणार, काही सूचना असतील तर करा, असे सांगत आपल्यासोबत असणाऱ्या विशेष अधिकाऱ्यांना त्यांची नोंद घेण्यास सांगितले.
सेल्फीसाठी गर्दी - अजित पवार यांनी ठाण्यावरुन नाशिकसाठी वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला. यावेळी प्रवाशांनी अजित पवार यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. अजित पवार हे वृत्तपत्र वाचत प्रवास करत होते. त्यातच अनेक प्रवासी अजित पवार यांच्यासोबत सेल्फी काढताना दिसत होते. तसेच वंदे भारत एक्सप्रेसमधील कर्मचाऱ्यांनीही अजित पवार यांच्यासोबत सेल्फी घेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहेत.
अजित पवार नाशिकमध्ये - शासन आपल्या दारी या उपक्रमाचे शनिवारी नाशिक येथील डोंगरे वस्तीगृह मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी पालकमंत्री दादा भुसे देखील तिथे उपस्थित होते. विविध योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका छताखाली शासकीय निर्धारित शुल्कात 200 हून अधिक वेगवेगळ्या योजनांचा कमीत कमी कागदपत्रे आणि जलद मंजुरी अशा पद्धतीने लाभ प्रत्यक्ष स्वरूपात घेता येणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
हेही वाचा -Ajit Pawar At Silver Oak : बंडखोरीनंतर अजित पवार पहिल्यांदाच शरद पवारांच्या घरी, जाणूून घ्या भेटीमागचे कारण