मुंबई - माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी हे भारतातील संगणक क्रांतीचे जनक आहेत. देशाने माहिती-तंत्रज्ञान व दूरसंचार क्षेत्रात केलेली प्रगती ही त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाली आहे. आजचा ‘डिजिटल इंडिया’ दिवंगत राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
'दिवंगत राजीव गांधींनी रचलेल्या पायावरच आजचा ‘डिजिटल इंडिया’ भक्कम उभा' - rajiv gandhi death anniversary news
आजचा ‘डिजिटल इंडिया’ दिवंगत राजीव गांधींनी रचलेल्या पायावर भक्कमपणे उभा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.
राजीव गांधी यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले, दिवंगत राजीव गांधींसारखा युवा पंतप्रधान देशाला लाभल्याने युवकांच्या हिताचे अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले गेले. देशात संगणक युग सुरू करण्याचे श्रेय राजीवजींना आहे. आज कोरोनाच्या संकटात अनेकजण ‘वर्क फ्रॉम होम’ करत आहेत. ‘व्हीसी’द्वारे(व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधत आहेत. हे देखील राजीवजींनी त्याकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे शक्य झाले असल्याचेही पवार म्हणाले.
वयाची अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांना मतदानाचा अधिकार देऊन त्यांनी युवकांना निर्णयप्रक्रियेत संधी दिली. सर्वधर्मसमभाव वाढावा, देशात व उपखंडात शांतता नांदावी म्हणून काम केलं. त्यांचा स्मृतीदिन 'दहशतवादी व हिंसाचारविरोधी दिवस' म्हणून पाळत असताना वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातून दहशतवाद, हिंसाचार संपवण्याचा निर्धार करुया, असे आवाहनही यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.