मुंबई - कोरोनाच्या संकटातही मोठ्या जल्लोषात आणि मंगलमय वातावरणात घरोघरी विराजमान झालेल्या गणरायाच्या दीड दिवसांच्या मूर्तींचे आज (शनिवार) मोठ्या भक्तिभावाने विधिवत विसर्जन झाले. नैसर्गिक व कृत्रिम ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी पुढच्या वर्षी लवकर, आणि कोरोनाचे संकट दूर करा, या अशी आर्त साद घालत भावपूर्ण निरोप दिला.
६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन -
मुंबईच्या चौपाट्या, नैसर्गिक टाळा आणि कृत्रिम तलाव या ठिकाणी विसर्जनाला आज सकाळी १२ वाजल्यापासून सुरूवात झाली. त्यामुळे चौपाट्या आणि सार्वजनिक तलाव भाविकांनी फुलून गेले आहेत. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६११६ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये १५ सार्वजनिक, ६०४७ घरगुती तर १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले. विसर्जित करण्यात आलेल्या एकूण ६११६ मूर्तींपैकी कृत्रिम तलावात ३६०० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कृत्रिम तलावात ४१ सार्वजनिक, ३५४८ घरगुती तर ११ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले.
कोरोना नियमांचे पालन करा -
काल शुक्रवारी घरोघरी गणपती मंगलमूर्ती विराजमान झाल्या होत्या. मुंबईत सुमारे दोन लाख घरगुती मूर्तींची तर १० हजाराहून अधिक सार्वजनिक मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. दिवसभर गणरायाची भक्ती भावाने पूजा, आरती करीत लहान थोरांनी आपल्या आरोग्यासाठी बापाकडे प्रार्थना केली. मुंबईत हजारो दीड दिवसांच्या गणरायाच्या मूर्तींचे विसर्जन होणार आहे. त्याकरता पालिकेने तयारी केलीच आहे. मात्र, गेल्या वर्षी प्रमाणे करोनाचे सावट असल्याने भाविकांनी काळजी घेत आणि नियमांचे पालन करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप ध्यावा असे आवाहन पालिकेने केले आहे.