मुंबई :मुंबईच्या भांडुप उपनगरामध्ये तीन दिवसापूर्वी एका सार्वजनिक सभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. ही टीका करत असताना त्यांनी सार्वजनिकरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केल्याचा आरोप भांडुप येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून केला गेला होता. त्यानंतर भांडुप पोलिसांनी ठाण्यामध्ये तसा गुन्हा देखील दाखल केला गेला होता. त्यामुळं दत्ता दळवी यांना मुलुंड न्यायालयानं न्यायालयीन कोठडी देखील सुनावलेली होती.
जामीन हा घटनात्मक अधिकार: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते माजी महापौर दत्ता दळवी यांच्यावतीनं वकिलांनी मुलुंड न्यायालयात जामीन मिळण्यासाठी तातडीनं जामीन अर्ज दाखल केला. त्या संदर्भात जामीन मिळणं कायदेशीर आहे. जामीन हा प्रत्येक आरोपीचा मूलभूत हक्क आहे, या आधारे ज्येष्ठ वकील संदीप सिंह यांनी मुलुंड न्यायालयात युक्तिवाद केला.
आरोपी तपासावर प्रभाव टाकू शकतात :पोलिसांच्यावतीनं वकिलांनी जामीनास देखील विरोध केला. त्याचं कारण देताना वकिलांनी म्हटलं की, यांना जामीन मिळाल्यास वातावरण बिघडू शकतं. ते तपासावर प्रभाव टाकू शकतात. तपासामध्ये छेडछाड करू शकतात. म्हणून त्यांना जामीन देऊ नये.
अशा खटल्यांमध्ये जामीन मिळणं हक्क आहे :ज्येष्ठ वकील संदीप सिंह यांनी बाजू मांडली की "मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये असे विविध खटले आहेत; "की ज्यामध्ये अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचे खटले असताना देखील जामीन दिला जातो. हा गंभीर गुन्हा नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दाखल्यानुसार या प्रकरणात न्यायालयाला जामीन देता येतो. त्याच्यामुळं न्यायालयानं जामीन द्यावा अशी विनंती त्यांनी न्यायमूर्ती एस एम वाशीमकर यांच्याकडं केली.
न्यायालयानं काय म्हटलं :दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती एस एम वाशीमकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर दत्ता दळवी यांना काही अटी आणि शर्तीसह जामीन मंजूर केला. 15000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तसंच आठवड्यातून एकदा सोमवारी भांडुप पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावावी. तपासामध्ये सहकार्य करावे; अशा अटीसह हा जामीन न्याय दंडाधिकारी एस एम वाशीमकर यांनी मंजूर केला.
उबाठा गटाची प्रतिक्रिया :आमदार सुनील राऊत म्हणाले, दत्ता दळवी हे मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत. ते एकेकाळचे प्रथम नागरिक आहेत त्यांनी कोणताही प्रचंड असा खुनाचा गुन्हा केलेला नाही. त्यांना जामीन मिळणारच होता. शिवसेना ही एकच आहे ती म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो.
हेही वाचा :
- पंतप्रधान मोदींचं दुबईत जोरदार स्वागत; मोदींच्या भेटीनंतर काय म्हणाले दुबईतील भारतीय ?
- मेक्सिकन 'डीजे'वर बलात्कार करुन अनैसर्गिक अत्याचार; वांद्रे पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
- शरद पवारांकडे 'तेव्हा' पंतप्रधानपदाची संधी होती, मात्र त्यांनी ती घेतली नाही; प्रफुल पटेल यांचा गौप्यस्फोट