मुंबई- महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत २० नोव्हेंबर रोजी संपली होती. मात्र, ती मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तर, या मुदतीत ज्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे आज शिक्षण मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे मंडळाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी ५ ऑक्टोबरपासून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली होती. विलंब शुल्कासह ६ ते १५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची पहिली मुदत देण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये मुदत वाढ करत ती २० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.