मुंबई : Uddhav Thackeray Dasara Melava : दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आमदार अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा शाधलाय. सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळी यांना फटकारत आहे. पण प्रत्येक वेळी निर्लज्ज सदासुखी, असा यांचा खेळ सुरू असल्याचं ठाकरे म्हणाले.
टीकेला किंमत देत नाही : ते आमच्यावर टीका करतात, मात्र, मी त्यांच्या टीकेला किंमत देत नाही. माझ्यासमोर महाराष्ट्रातील गरीबांचे प्रश्न आहेत. जातीभेदाच्या भिंती उभ्या करून आपापसात भांडण निर्माण करण्याचा भाजपाचा डाव आहे. मात्र, मी जरांगे यांचा विशेष आभारी आहे. त्यांनी वेळीच डाव ओळखलाय. त्यांनी आणखी सावध राहण्याची गरज असल्याचं ठाकरे यांनी म्हटलंय. आपण सर्व एकाच मातीचे आहोत, असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले.
ते साधे नसून ढोंगी : ज्यांच्याविरुद्ध आपण लढत आहोत, ते साधे नसून ढोंगी आहेत. भाजपा इतका असंतुष्ट आहे की कोणाचे लग्न असले, तरी ते जाऊन रांगेत सामील होतील. हा पक्ष जिथे जातो तिथं नाश करतो. त्यामुळं मी जरांगे पाटील यांना सांगतो, त्यांच्यापासून सावध राहा. हा भगवा आपल्याला अभिमानानं फडकवायचा आहे. जवळपास एक वर्ष झालं. अपात्रतेच्या निर्णयासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. मला काय करावं कळत नाही. कारण सर्वोच्च न्यायालय प्रत्येक वेळी त्यांची कानउघाडणी करत आहेत. पण, प्रत्येकवेळी निर्लज्ज सदासुखी, सारख नवीन वेळापत्रक मांडू असं न्यायालयात सांगताय, असंही ठाकरे म्हणाले.
भारतात लोकशाही टिकणार का? : मला कोणाचाही अपमान करायचा नाही. न्यायाधीशांवर माझा विश्वास आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावायचा तो लावा, पण आज संपूर्ण देश अपात्रतेच्या निर्णयाकडं पाहत आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाला हे जुमानत नसेल, तर सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व राहणार आहे की नाही? या देशात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचं अस्तित्व राहणार आहे का? भारतात लोकशाही टिकणार की नाही? याकडं आमचं लक्ष आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.