मुंबई: प्रवासी असलेल्या बेस्ट बसच्या चालकास मारहाण करणाऱ्या आणि बेस्ट बसची तोडफोड करून सार्वजनिक मालमत्तेची नुकसान करणाऱ्या दोघा जणांना दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. संजीव गौरीशंकर सिंग (47 वर्ष), समीर दत्ताराम सुर्वे (45 वर्ष) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना 17 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बसची आणि व्हॅगनार कारची धडक:काल रात्री फिर्यादी रमेश पवार हे त्यांच्या सहकारी असलेल्या कंडक्टर भारत मुंबईकर हे बेस्ट बस क्रमांक एम एच 01 एम एल 6432 ही बस दिंडोशी बस डेपो येथून काशी गावच्या दिशेने जात असताना रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी बस पायल जंक्शन दहिसर चेक नाका जवळ आली असताना व्हॅगनार कार क्रमांक एम एच 04, जीएम 99 37 ही बसला ड्रायव्हरच्या बाजूस येऊन धडकली.