महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दहिसर ज्वेलर्स खून प्रकरणी मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या आवळल्या, मध्य प्रदेशातून अटक - मुंबई ज्वेलर्स खून न्यूज

दहिसरमध्ये ज्वेलर्सच्या मालकाला गोळ्या घालून दुकानातलं सोनं लुटणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बंटी पाटीदार असे त्या आरोपीचे नाव आहे. बंटीसह त्याच्या एका साथीदाराला मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशमधून अटक केली आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांना अटक करण्यात आली आहे.

mumbai
mumbai

By

Published : Jul 5, 2021, 11:49 AM IST

Updated : Sep 11, 2021, 5:17 PM IST

मुंबई -चोरीला विरोध केल्यामुळे ज्वेलर्सच्या मालकाचा गोळी झाडून खून केल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी मुख्य सूत्रधार बंटी पाटीदार आणि त्याच्या एका साथीदारास मुंबई पोलिसांनी मध्य प्रदेशातून अटक केली आहे. यापूर्वी 1 जुलै रोजी याच प्रकरणातील 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ज्वेलर्सच्या मालकाला गोळी घालून सोनं लंपास

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रावळपाडा परिसरात 30 जून रोजी सकाळी सुमारे साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका मोपेडवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार करत ओम साईराज ज्वेलर्समध्ये चोरी केली होती. यावेळी दुकानाच्या मालकाने चोरट्यांना विरोध केला. त्यामुळे चोरट्यांनी मालकावर एक गोळी झाडली. यात दुकान मालकाचा जागीच मृत्यू झाला. यानंतर चोरट्यांनी दुकानातील सोनं गोळा करून तेथून पळ काढला होता. दरम्यान, घटनेची महिती मिळताच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.

घटनेनंतर मुंबईत नाकाबंदी

त्यानंतर नांगरे पाटलांनी मुंबईच्या सर्व एन्ट्री पाॅईंटवर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. तपासासाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी यांनी दिली होती.

आरोपींचा बुट बनला मुख्य धागा

यापूर्वी या प्रकरणातील पाच आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणातील आरोपींनी वापरलेला बुट हा मुख्य धागा बनला होता, असे मुंबई पोलीसचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा तपास करुन या पाच आरोपींना अटक केली. यातील चिराग रावल आणि अंकित महाडिक या आरोपींनी हा सर्व कट रचला होता. तर आयुष्य पांडे, निखिल चांडाळ, उदय बाली या तीन आरोपींना मध्य प्रदेश राज्यातून गुन्ह्यासाठी बोलवण्यात आले होते.

गुजरातमधून आरोपींना अटक -

हे आरोपी गुजरातमधील एका खेडेगावातील घरामध्ये लपले होते. पोलिसांनी सर्व प्रकरणातील कड्या जोडून त्यांना याठिकाणाहून अटक केली. प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, या गुन्ह्यासाठी एका दुचाकीचा वापर केला. ती गाडी देखील दहिसर परिसरातून चोरी करण्यात आली होती. तसेच एका कारचा देखील वापर केला होता, असे नांगरे पाटलांनी सांगितले.

30 तोळे सोने जप्त -

या प्रकरणातील सर्व आरोपी हे 21 वर्ष वयोगटातील आहेत. जो संशयित आरोपी प्रथम पकडण्यात आला होता, तो कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हता. त्याचे सोशल मीडिया अकाऊंट तपासण्यात आले. तेव्हा अन्य आरोपींची ओळख पटली. त्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील कारवाई जलद गतीने करण्यात आली. आरोपींकडून एकूण ३० तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. तर, आता याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बंटी पाटीदारसह त्याच्या एका साथीदारालाही अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Sep 11, 2021, 5:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details