मुंबई :शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. कालच दहिसर पोलिसांनी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या युवासेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. तर आज शीतल म्हात्रे यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ दोन अज्ञात व्यक्तींनी पाठलाग केला. म्हणून दादर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (डी), ३५२ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दादर पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल :दादर पोलीस ठाण्यात शीतल म्हात्रे यांनी दोन अज्ञात इसमांनी केलेल्या पाठलाग प्रकरणी आज जबाब नोंदवला. त्यानंतर दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शितल मुकेश म्हात्रे वय 48 वर्षे यांनी पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात अशी माहिती दिली की, शिवसेना पक्षाची उपनेता म्हणून काम पाहते. 2017 मध्ये नगरसेवीका म्हणून निवडून आलेल्या आहेत. सद्या शीतल म्हात्रे शिवसेना या पक्षाची प्रवक्ता म्हणून काम पाहत आहेत. १३ मार्चला नेहमीप्रमाणे शीतल म्हात्रे त्यांची आई शिवाजी पार्क येथील श्री कृपा सोसायटी येथे राहत असल्याने तीला भेटण्यासाठी शिवाजी पार्क या ठिकाणी गेल्या होत्या. नंतर माझ्या आईला भेटून दुपारी 3.00 ते 03.30 वाजेच्या दरम्यान चर्चगेट येथील बाळासाहेब भवन या ठिकाणी जाण्यास त्या निघाल्या. तपकिरी रंगावी इनोव्हा एमएच 47 ए एन 81.23 या वाहनाने जाण्यासाठी निघाल्या होत्या.