मुंबई : अरबी समुद्राच्या पूर्वमध्य आणि आग्नेय भागातील चक्रीवादळ बिपोरजॉय हे पुढील 24 तासात उत्तरकडे सरकणार आहे. तसेच चक्रीवादळ तीव्र स्वरुप धारण करण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या चक्रीवादळाचा वेग 11 किलोमीटर प्रतितास असून पुढील 12 तासात याचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
तीव्र चक्रीवादळात रूपांतर होणार :मंगळवारी संध्याकाळी पूर्वमध्य व लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर चक्रीवादळ “बिपोरजॉय” निर्माण झाले. पुढील 24 तासांत “बिपोरजॉय” पूर्वमध्य अरबी समुद्रात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता. यामुळे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. हे वादळ गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे 890 किमी अंतरावर आहे. मुंबईच्या नैऋत्य बाजुला 1 हजार किमी अंतरावर आहे. तर पोरबंदरपासून हे वादळ 1 हजार 070 किमी अंतरावर आहे. पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस हे बिपोरजॉय वादळ आहे.
मॉन्सूनवर होणार परिणाम : हवामान खात्याने मंगळवारी सांगितले होते की, या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या हालचालीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली होती. ही शक्यता खरी ठरली असून चक्रीवादळामुळे केरळमध्ये मान्सून उशीरा दाखल होणार आहे. केरळमध्ये 8 जूनला तर मुंबईत 16 जूनच्या आसपास मॉन्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. दरम्यान या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु हा मॉन्सूनचा पाऊस नसणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.