मुंबई- कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची चिन्हे दिसत आहेत. या लॉकडाऊनच्या काळात सर्वात जास्त त्रासदायक जर कुणाला होत आहे तर तो वृद्ध आणि एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना. या काळात त्यांच्या मदतीला धावले ते सायकलपटू. रिलिफ रायडर या संस्थेने तब्बल 550 पेक्षा जास्त गरजूंना आणि एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामुळे सील झालेल्या इमारतीमध्ये तसेच ज्येष्ठ नागरिक, रुग्णांचे नातेवाईकांना औषधे, अन्न पोहोचवण्याचे काम या संस्थेमार्फत करण्यात येते. या संस्थेनं आतापर्यंत 3,858 किलोमीटर पर्यंतचा मुंबईत प्रवास करून गरजूंना मदत केली आहे.
रिलिफ रायडर संस्थेची बांधणी कशी?
रिलिफ रायडर संस्थेचे मुंबईत 137 सायकलचालक आहेत. मदत करण्याच्या अनुषगांने या संस्थेने मुंबईतील काही परिसरांची विभागणी केली आहे. कुलाबा ते दादर, दादर ते बांद्रा, बांद्रा ते अंधेरी, अंधेरी ते दहीसर, दहीसर ते विरार अशी विभागणी केली आहे. या विभागाच्या प्रत्येक ठिकाणी एक टास्क कॉर्डिनेटर नेमण्यात आला आहे. एखाद्या व्यक्तीला मदत लागणार असल्याची माहिती टास्क कॉर्डिनेटर तिथल्या ग्रुपमध्ये पोस्ट करतो. त्यानंतर त्या परिसरात असणारा व्यक्ती तत्काळ त्या गरजू व्यक्तीला मदत पोहोचवतो.