मुंबई : घरी बसून पैसे कमवण्याच्या नादात विरारमधील एका डॉक्टराला सायबर चोरट्यांनी सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातला. सिनेमाला रेंटीग द्या आणि घरबसल्या पैसे कमवा अशा टास्क फ्रॉडच्या भूलथापांच्या डॉक्टर असलेली व्यक्ती बळी पडली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. टास्क पूर्ण करणे, लिंक वरती क्लिक करणे अथवा जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरटे अनेकांना आपल्या जाळ्यात ओढत असतात. अशा प्रकारच्या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये, म्हणून पोलीस अनेकदा नागरिकांना आवाहन करत असतात. तरी देखील उच्चभ्रू डॉक्टर सारखे देखील अशा प्रकारच्या सायबर क्राईमला बळी पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अशी झाली फसवणूक : विरारमध्ये राहणारे हे ४३ वर्षांचे व्यवसायाने डॉक्टर आहेत. जानेवारी महिन्यात टेलिग्रामवर त्यांची ओळख हाफिजा आर्या नावाच्या महिलेशी झाली. विविध सिनेमांना रेंटीग दिल्यास घरबसल्या पैसे मिळतील, असे त्या महिलेन डॉक्टरला सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी टेलिग्रामवरील टास्क पूर्ण केले. सुरुवातील फिर्यादी यांचा विश्वास बसावा यासाठी त्यांना काही पैसे दिले. त्यानंतर मात्र कमिशनची रक्कम जास्त आहे, तसेच आयकर खात्याची धमकी देत वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे पाठविण्यास सांगितले. जानेवारी ते मे या पाच महिन्यात फिर्यादी डॉक्टरने १ कोटी ७ लाख ९० हजार रुपये भरले. मात्र त्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.