मुंबई Cyber Fraud : महाराष्ट्र सायबर सेल मुंबईच्या नोडल सायबर पोलीस ठाण्यात तीन तारखेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले (वय 45) त्यांनी केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संविधान कलम 465, 467, 468, 469, 471, 419 420 आणि 120 ब तसंच माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 66 क आणि 66 ड अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांना मोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागले. कारण आरोपीने ओपन वाय-फायद्वारे हा सायबर क्राईमचा गुन्हा घडवून आणला होता.
'या' बनावट ईमेल वरून आला मेल :vidyadharmahale.min@gmail.com हा खोटा ईमेल आयडी तयार करून आरोपी मोहम्मद इलियाज याकूब मोमीन (वय 40) याने या ईमेल आयडी वरून पाठवण्यात आलेल्या बनावट पत्रांवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बनावट सही होती. त्याचप्रमाणे तोतयेगिरी करून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचारी तसंच सामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले. तो स्वतःची ओळख लपवून इंटरनेटचा वापर करून शासनाच्या सेवेतील कर्मचारी आणि अधिकारी तसंच सामान्य नागरिकांची आर्थिक लुबाडणूक केल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे पोलीस अधीक्षक संजय शिंत्रे यांनी दिली आहे.
काय होते प्रकरण :उपकार्यकारी अभियंता गणेश असमर यांची भांडुप शहर परिमंडळ येथून पुणे परिमंडळ येथे बदली करण्यात आली असल्याचा मेल आरोपी मोमीन याने पाठवला होता. तसंच सहाय्यक अभियंता दुर्गेश जगताप यांची रत्नागिरी परिमंडळातून कल्याण परिमंडळात बदली करण्यात आली आहे, असा मेल पाठवण्यात आला होता. तर सहाय्यक अभियंता मनीष धोटे यांची जळगाव परिमंडळातून अमरावती परिमंडळात, यशवंत गायकवाड यांची रत्नागिरी परिमंडळातून पुणे परिमंडळात त्याचप्रमाणे सहाय्यक अभियंता ज्ञानोबा राठोड यांची नाशिक परिमंडळातून पुणे परिमंडळ, सहाय्यक अभियंता योगेश आहेर यांची नाशिक परिमंडळातून औरंगाबाद परिमंडळात प्रस्तावित बदली करण्यात आली अशी माहिती देणारे पत्र आरोपीने संबंधित अधिकाऱ्यांना पाठवले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सहाही अधिकाऱ्यांची सायबर विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतरच त्यांनी किती रक्कम आरोपीला दिली होती हे स्पष्ट होईल, असे देखील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.