मुंबई :राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून कोरोनाला घेऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी सोशल माध्यमांवर काही असामाजिक तत्त्व परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न सध्या केला जात असल्यामुळे अशा समाजकंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 516 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 216 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
लॉकडाऊनकाळात राज्यभरात विवादास्पद वॉट्सअप पोस्ट फॉरवर्ड केल्याप्रकरणी 197 गुन्हे, फेसबुक पोस्टप्रकरणी 215 गुन्हे दाखल झाले आहेत. तर, टिकटॉक व्हिडिओ शेअरप्रकरणी 28 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचे मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 11 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर, ऑडिओ क्लिप, युट्युबसारख्या माध्यमांचा गैरवापर केल्याप्रकरणी 61 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.