मुंबई - गेल्या वर्षभरापासून मुंबई शहरात लॉकडाऊनचे निर्बंध लादण्यात आल्यानंतर शहरातील बहुतांशी दुकाने ही अधूनमधून बंद ठेवण्यात येत होती. याचा परिणाम म्हणून मुंबई शहरातील नागरिकांकडून ऑनलाइन शॉपिंगला सर्वात अधिक प्राधान्य देण्यात येत आहे .मात्र , 2020च्या पहिल्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च) 2021च्या पहिल्या तिमाहीशी तुलना केली तर 2020 मध्ये (जानेवारी ते मार्च) यादरम्यान 760 सायबर गुन्हे घडलेले होते. मात्र, हेच प्रमाण 2021मध्ये (जानेवारी ते मार्च) या महिन्यात घटून 639 सायबर गुन्ह्यांवर आले आहे. याबाबत ईटीव्ही भारतने विशेेेष आढावा घेतला.
"या' सायबर गुन्ह्यात झाली घट -
जानेवारी ते मार्च 2020मध्ये मुंबई शहरात क्रेडीट कार्डच्या संदर्भात तब्बल 157 गुन्हे घडले होते. मात्र , हेच प्रमाण घटत जानेवारी ते मार्च 2021 या तीन महिन्यांमध्ये 134वर आलेल आहे.असाच काहीसा प्रकार सोशल माध्यमांवर बनावट प्रोफाईल बनवण्याच्या संदर्भात दिसत आहे.
2020च्या पहिल्या तिमाहीत 13 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, हेच प्रमाण घटत 2021 मध्ये 9 गुन्ह्यांवर आले आहे. अश्लील ईमेल, एसएमएस, एमएमएस पाठविण्याच्या संदर्भात 2020च्या पहिल्या तिमाहीत 59 गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र, हेच प्रमाण किंचित वाढून 2021 च्या पहिल्या तिमाहीत 67वर आले आहे.
इंटरनेटवर फिशिंग, हॅकिंग व नायजेरियन फ्रॉडच्या संदर्भात 2020च्या पहिल्या तिमाहीत 15 गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र, हेच प्रमाण 2021च्या पहिल्या तिमाहीत घटून 4 वर आले आहे. इतर प्रकरणांमध्ये 2020च्या पहिल्या तिमाहीत मुंबईत 513 गुन्हे नोंदविण्यात आले होते. मात्र, हेच प्रमाण पुन्हा घटत 2021च्या पहिल्या तिमाहीत 422 गुन्ह्यांवर आले आहे.
सायबर गुन्हे घटल्याचा दावा करता येणार नाही - सायबर तज्ञ
ज्येष्ठ सायबर तज्ञ रितेश भाटिया यांच्या मतानुसार मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडून देण्यात आलेला वरील तपशील हा सर्व समावेशक नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागात प्रत्येक वेळेस सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींची योग्य दखल घेतली जातेच असं होत नाही. सायबर पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारी अर्जाबद्दल गुन्हा दाखल केला जातोच, असंही होत नाही. मुंबई पोलिसांकडून केवळ गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये नोंद घेतली जात आहे. त्यामुळे मुंबई शहरात सायबर गुन्हेगारी ही 2020च्या तुलनेत 2021मध्ये घटली असल्याचा दावा करता येणार नाही.