गोवा -गोव्याच्या सांस्कृतिक मंत्र्याने काल चक्क मुंबईवर स्वारी केली. कुठे म्हणून काय विचारता अहो विधान भावनावर नव्हे तर मराठी व्यवसायिक नाटकाचे माहेरघर असलेल्या शिवाजी मंदिरवर. त्यासाठीचे निमित्तदेखील तसच खास होते, दस्तुरखुद्द सांस्कृतिक मंत्र्यांची मुख्य भूमिका असलेल्या 'इथे ओशाळला मृत्यू' या नाटकाचा खास सोहळा मुंबईतल्या या नाट्य मंदिरात रंगला होता.
खर पाहता सांस्कृतिक मंत्र्यांचा कला संस्कृती याच्याशी काहीतरी संबंध असावाच, अशी काही अट नाही. निदान तो कला, साहित्य, नृत्य, नाट्यकलेचा दर्दी असला तरीही पुरेस असतं. मात्र गोव्याचे विद्यमान सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे हे या सगळ्याला अपवाद आहेत. कारण वयाच्या सातव्या वर्षांपासून नाटकाची आवड जपणारे तावडे हे स्वतः एक उत्तम अभिनेते आहेत. आजवर अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक नाटकांमध्ये काम करून त्यांनी अनेक पुरस्कारदेखील मिळवले आहेत. आपली राजकीय जबाबदारी पार पाडताना ते आपल्या या आवडीसाठी देखील आवर्जून वेळ काढतात.
गोविंद गावडे हे अपक्ष आमदार म्हणून गोव्यातून निवडून आले. त्यानंतर त्यांनी सरकार स्थापन करताना भाजपला पाठींबा दिला. त्यामुळे लगेचच त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली. त्यांचे सांस्कृतिक क्षेत्रावरील प्रेम आणि आस्था पाहून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यांची सांस्कृतिक खात्याचा मंत्री म्हणून नियुक्ती केली. आजही ते ही आठवण आवर्जून सांगतात.
वसंत कानेटकर लिखित 'इथे ओशाळला मृत्यू' हे नाटक घेऊन ते मुंबई दौऱ्यावर आले होते. यापूर्वी त्यांच्या या नाटकाचे प्रयोग पुणे आणि कोल्हापूर येथेही झाले आहेत. नाटकात गावडे हे स्वतः संभाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारतात. त्यांनी साकारलेले संभाजी महाराज पाहणे ही मोठी पर्वणीच आहे.