मुंबई- कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी बीकेसी येथे उभारण्यात आलेल्या बीकेसी कोविड सेंटरला अधिकाधिक अद्ययावत, अत्याधुनिक सुविधायुक्त करण्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) भर आहे. त्यातूनच आता या सेंटरमध्ये देशातील पहिले 'सी.टी इनबॉक्स' मशीन बसवण्यात आले आहे. या मशीनद्वारे रुग्णांच्या फुफ्फुसातील संसर्गाचे निदान केवळ १६ सेकंदात करणे शक्य होणार आहे. ही मशीन आता मुंबई महानगर पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
या मशिनीमुळे कोरोना रुग्णांना वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यास आता मदत होणार असल्याची माहिती महानगर आयुक्त आर.ए राजीव यांनी दिली. एमएमआरडीएने बीकेसीत दोन टप्प्यात कोविड सेंटर उभारत ते पालिकेकडे व्यवस्थापनासाठी हस्तांतरित केले आहे. या सेंटरमध्ये आजपर्यंत शेकडो रुग्ण बरे होऊन गेले असून हे सेंटर सुविधा आणि उपचारासाठी पहिल्या क्रमांकाचे मानले जाते. त्यात आता या सेंटरमध्ये आणखी एक अत्याधुनिक निदान पद्धती सुरू करण्यात आली आहे. ती म्हणजे सी टी इनबॉक्स.