मुंबई :राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असताना ठाणे, पालघरसह राज्यातल्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला. वाशिम नाशिक छत्रपती संभाजी नगर पैठण गंगापूर परिसरात अनेक भागात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा आदी पिकांचा यामध्ये समावेश आहे.
तात्काळ पंचनामे करावेत : शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. दुसरीकडे अवकाळी पावसाने हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तात्काळ पंचनामे करावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच, महसूल यंत्रना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने कामाला लागावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
गारपीटसह जोरदार पावसाचा अंदाज : काल सोमवारी मध्यरात्रीपासून सकाळी १० वाजेपर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक आदी भागात रिमझिम पावसाच्या अधून-मधून सरी कोसळल्या आहेत. दरम्यान, दिवसभर ढगाळ वातावरण राहील. राज्यात बदलत्या वातावरणामुळे येत्या दोन-तीन दिवसात गारपीटसह जोरदार पाऊस होईल, असा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना यावेळी कराव्यात, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.