मुंबई : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात शुक्रवारी पुन्हा एकदा गारपीट झाली. आठ दिवसांपूर्वी साक्री तालुक्याच्या उत्तर भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. शुक्रवारी साक्रीच्या माळमाथा परिसरात लिंबाच्या आकाराची गारपीट झाली. गारपीटीमुळे रस्ते व शेतं बर्फाने आच्छादले होते. या गारपीटीमुळे गहू, हरबरा, मका, भाजीपाला तसेच फळबागांचं देखील प्रचंड नुकसान झालं आहे. शेती क्षेत्राबरोबरचं घरांचं देखील नुकसान झाले आहे. गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर सरकार मदत करणार का?, असा सवाल शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
नाशिक जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा : नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलंच जोडपलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक मध्ये सतत पाऊस होतो आहे. चांदवड तालुक्याच्या दक्षिण - पूर्व भागात सुपारीच्या आकाराच्या गारांचा वर्षाव झाला. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे पडलेल्या गारांनी शेतात दोन ते तीन इंचाचा थर साचला होता. अभोण्यात दोन तास जोरदार पाऊस झाला. तसेच अनेक ठिकाणी गारपीटही झाली. सिन्नर आणि मनमाड मध्येही जोरदार पाऊस झाला. या पावसाच्या तडाख्याने नाशिक जिल्ह्यातील काढणीला आलेला गहू, कांदा, द्राक्ष, आंबा इत्यादी फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील गंगावे, विटावे, भोयेगाव, हिरापूर पन्हाळे आदी भागात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारात जोरदार गारपीट झाली. त्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात देखील जवळपास दोन तास जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. अभोना परिसरात शेतामध्ये काढून ठेवलेला कांदा, मिरची, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत हरभरा, कांदा पिकाचे देखील नुकसान झाले आहे. मनमाड मध्ये सलग पाच दिवसांपासून पाऊस होत असल्याने या ठिकाणचा शेतकरी अडचणीत सापडला आहे.