मुंबई- राज्यात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना सायबर गुन्हेगारांकडून कोरोनामुळे मृत पावणाऱ्या व्यक्तींच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही टोळी कोरोनामुळे मृत पावलेल्या एका व्यक्तीच्या बँक खात्यातील पैसे परस्पर लूटत आली होती. 25 जुलैला गुन्हे शाखेच्या युनिट 11 ने दहिसर परिसरातील एका झोपडपट्टीमध्ये केलेल्या कारवाईत शफिक मेहबूब शेख, प्रितेश बिपिनचंद्र मांडलीया, अर्शद रफिक सय्यद, स्वप्नील विनोद ओगलेकर या आरोपींना अटक केली आहे.
आरोपींना घेऊन जाताना गुन्हे शाखेचे पथक मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाचे 20 जूनला कोरोनामुळे निधन झाले होते. या मृत व्यक्तीच्या कार्यलयात मागील काही वर्षांपासून काम करणाऱ्या शफिक मेहमूद शेख या आरोपीने मृत बिल्डरच्या कार्यालयातील बँक पासबूक, चेकबूक्स व रोख रक्कम लंपास केली होती. यानंतर त्याने अर्शद रफिक सय्यद या आरोपीला चोरलेली कागदपत्रे दिली होती. आरोपी अर्शद हा मुंबईत वेगवेगळ्या बँकेत काम करत होता व काही महिन्यांपूर्वी तो परदेशात नोकरीसाठी गेला होता. मात्र, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तो पुन्हा मुंबईत परतला होता. परदेशात असताना त्याने ऑनलाईन बँकींग फ्रॉड (फसवणूक) संदर्भात लागणाऱ्या सर्व तांत्रिक गोष्टी शिकून घेतल्या होत्या.मृत बिल्डरची कागदपत्रे मिळाल्यानंतर बनावट आधार कार्ड बनवून त्याद्वारे मृत बिल्डरच्या नावाचे रजिस्टर मोबाईल क्रमांकाचे डुप्लिकेट मोबाईल सिम कार्ड मिळवण्यात आले होते. मृत व्यक्तीच्या विविध बँक खात्यातील पैसे लुटण्यासाठी ही टोळी परदेशातून आणलेले एक सॉफ्टवेअर वापरत होती. ज्यामुळे मोबाईल फोन, लॅपटॉपचा आयपी अॅड्रेस लोकेशन हे परदेशातून दिसत होते. यामुळे ही फसवणून परदेशातीन झाल्याचा बनाव आरोपीनी निर्माण केला होता.मृत व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अरलॅब्स प्रायवेट लिमिटेड, प्रभाव प्रॉपर्टिज् लिमिटेड या कंपन्यांचा व्यवहार कंपनीच्या व्यवस्थापकाकडून हाताळला जात होता. मात्र, मागील काही दिवसांपासून मृत बिल्डरच्या बँक खात्यातून गुगल पे, फोन पेने पैसे काढल्याचे लक्षात आल्यावर याबाबात पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरुन तांत्रिक तपासा दरम्यान या फसवणूक करणाऱ्या चौकडीच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.