मुंबई - महिलांसाठी मुंबई हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर मानले जाते. मात्र, प्रजा फाउँडेशन या सेवाभावी संस्थेतर्फे करण्यात आलेल्या 'स्टेट ऑफ पोलिसिंग अॅन्ड लॉ अॅन्ड ऑर्डर' च्या निरिक्षण अहवालात गेल्या काही वर्षात बलात्कार, विनयभंग, आणि दंगलीसारख्या घटनांमध्ये शहरात वाढ झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर दुसरीकडे 'चैन स्नाचिंग' सारख्या गुन्ह्यात तब्बल ९२ टक्क्यांनी घट झाल्याचेही समोर आले आहे.
२०१३-१४ ते २०१७- १८ पर्यंतच्या अहवालात बलात्कार, विनयभंग व दंगलीसारख्या गुन्ह्यांमध्ये अनुक्रमे ८३ टक्के, ९५ टक्के आणि ३६ टक्के वाढ दिसून आली आहे. तर २०१५-१६ ते २०१७-१८ या वर्षात लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये १९ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. २०१५-१६ मध्ये पोस्को कायद्यांतर्गत एकूण ८९१ गुन्हे दाखल झाले होते. तर २०१७-१८ मध्ये तक्रारींचे प्रमाण १ हजार ६२ एवढे नोंदविले गेले.
वाढत्या गुन्ह्यांबाबत प्रश्न विचारण्यात मुंबईच्या आमदारांना रस नाही-
मुंबई शहरात गेल्या काही वर्षात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१७ ते २०१८ च्या अर्थसंकल्पीय आशिवेशनात बलात्काराच्या विषयावर दक्षिण मुंबईच्या आमदारांनी सभागृहात केवळ ५ प्रश्न विचारले. ईशान्य मुंबईचे आमदार आणि उत्तर मुंबईच्या आमदारांनी सभागृहात प्रत्येकी २ प्रश्न विचारले.