मुंबई : महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बऱ्याच राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. आधी सिल्वर ओकवर महाविकास आघाडीची एकता अबाधित ठेवण्यासाठी बैठक पार पडली. त्यानंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांनी शरद पवार यांची भेट घेत विविध राजकीय विषयांवर चर्चा केली. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. या निकालाचा धडा घेत आता देशातील भाजप विरोधी पक्ष एकजूट व्यायला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज डी. राजा यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
'भाजप विरोधी पक्षांची मोट बांधणार' : या भेटीबाबत बोलताना डी. राजा म्हणाले की, 'आज शरद पवारांना भेटलो आणि त्यांच्याशी राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच विविध योजनांची माहिती त्यांना दिली. देशातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर आम्ही चर्चा करत असतो. भारतीय जनता पार्टीला पराभूत करायचे असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कर्नाटकच्या निकालाने हे दाखवून दिले आहे की भाजपाचा देखील पराभव होऊ शकतो. कर्नाटकमध्ये जसा भाजपचा पराभव झाला तसा लोकसभेच्या निवडणुकीत देखील त्यांचा पराभव केला जाऊ शकतो. आमचा पक्ष देखील तयारीला लागला आहे. म्हणून देशपातळीवर भाजप विरोधात मोट बांधण्याकरिता मी आज शरद पवारांची भेट घेतली'.