महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Corona Patient: कोविडने डोके वर काढले, राज्य सरकार अलर्ट मोडवर - कोरोना रुग्ण

राज्यात नियंत्रणात आलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. त्याच्या प्रतिंबधासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आले असून, आरोग्य यंत्रणा सतर्क केल्याचे निवेदन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान, राज्यात रुग्णवाढीचा दर सुमारे तीन टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. नागरिकांनी त्रिसुत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मंत्री सावंत यांनी केले आहे.

Covid
Covid

By

Published : Mar 23, 2023, 6:51 PM IST

मुंबई : राज्यात कोविड 19, एच1 एन1, एच3 एन3 आणि एन्फ्यूएन्जा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवेदन करावे, अशा सूचना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्य शासनाला दिल्या होत्या. त्यानुसार आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील रुग्ण संख्या आणि उपाययोजनांबाबतची माहिती परिषदेत दिली. राज्यात सध्या हंगामी साथीच्या आजाराची लक्षणे यात दिसून येत आहेत. राज्य शासनाने त्यामुळे सर्वेक्षण, चाचण्या वाढवावी अशा सूचना दिल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले आहे.

अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले : नोव्हेंबर महिन्यात नागपूर अधिवेशन काळात कोविड रुग्ण वाढले होते. त्यावेळी 2016 ठिकाणी मॉकड्रील केले होते. आरोग्य व्यवस्था आणि रुग्ण खाटांची संख्या, ऑक्सिजन पुरवठा, ऑक्सिजन प्लांट किती चालू आहेत. याबाबत आढावा घेतला होता. आता ही वाढत्या रुग्णावाढीमुळे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची आढावा बैठक घेतली. दरम्यान, जनजागृतीचे निर्देश दिले आहेत. तसेच, आरोग्य यंत्रणा पुर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. राज्यात 4 हजार पेक्षा जास्त वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मार्गदर्शन फलक लावण्याचे आदेश : गंभीर, आजारी, वृध्द, अति झोपेच्या व्यक्ती आरोग्य कर्मचारी यांना मोफत लसीकरण केले आहे. प्रत्येक जिल्ह्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरण, बूस्टर डोस देण्यासाठी प्रवृत्त करावे, असे आदेश दिले आहेत. लस घेण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी वितरीत केला आहे. लसीकरणाचा साठा उपलब्ध आहे का? याचा आढावा घेतला असून, नागरिकांनी काय करावे, याबाबत शहर आणि गावात लावण्याचे मार्गदर्शन फलक लावण्याचे आदेश दिल्याचे मंत्री सावंत यांनी परिषदेत दिले.

अशी घ्या काळजी :सर्दी, ताप, अंगदुखी आदी संसर्गजन्य लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्लाने औषधोपचार घ्या. मेडिकलमधून औषधे घेऊ नका, कोणताही आजार अंगावर काढू नका, असे आवाहन मंत्री तानाजी सावंत यांनी केले. तसेच, आशा वर्कर वरिष्ठ अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याचे ते म्हणाले आहेत.

रुग्णांची आकडेवारी :राज्यात एच1एन1 बाधितांची संख्या आज 405 इतकी आहे. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एच3एन2 बाधित संख्या 195 असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. संशयीत 3 रुग्ण आढळून आले असून कोविड बाधितांची संख्या 1308 इतकी असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले. तसेच कोविड रुग्ण वाढीचा दर 3 टक्के इतका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांचे आवाहन :वाढत्या रुग्ण वाढीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतीच बैठक घेतली. राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तोंडावर रुमाल, व्यक्तींमध्ये अंतर, सॅनिटरचा वापर या त्रिसुत्रीचा वापर करावा, अशा सूचना केल्या आहेत. तसेच तीव्र श्वसनाचा त्रास होणाऱ्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. रुग्ण वाढ रोखण्यासाठी चाचण्या वाढवा, जीनोम सिक्वेंस वाढवावी. पूर्वतयारीच्या सुस्पष्टततेसाठी सर्व रुग्णालयात मॉकड्रील करावे. वृध्द व्यक्ती, दीर्घ मुदतीचे आजार, मधुमेह, रक्तदाब, कॅन्सर, किडनी विकार जडल्यांनी मास्कचा वापर करावा, असे निर्देश केंद्र सरकारने राज्य शासनाला दिल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.

राज्यातील मृत्यूदर 1.8 टक्के इतका : राज्यात गुढीपाडवा म्हणजे बुधवारपर्यंत 1648 सक्रीय रुग्ण आहेत. तर विमानतळावर आरटीपीसीआर टेस्टमध्ये 33 हजार 291 चाचण्यामध्ये 42 रुग्ण पॉझिट्वीव सापडले आहेत. रुग्ण चाचणीतील पॉझिव्हीटी दर चार आठवड्यापूर्वी .52 इतका असून मागील आठवड्यात 4.09 टक्के इतका होता. दिवसागणिक पॉझिटिव्हीटी दर वाढ होत आहे. पुण्यात 9.61 टक्के, अहमदनगर 1.59 टक्के, औरंगाबाद 9.51 टक्के, कोल्हापूर 7.72 टक्के, सांगली 9.05 टक्के, सोलापूर 7.10 टक्के रुग्ण वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.8 टक्के इतका आहे.

सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर : मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर जिल्ह्यात दैनंदिन सक्रीय रुग्णवाढ सुरु आहे. दैनंदिन सरासरी चाचण्या 6 हजार 78 होत आहेत. एक्सबीबी 1.16 चे 62 रुग्ण आहेत. पुण्यात 50, ठाण्यात 8, मुंबईत 1, कोल्हापूरमध्ये 1, अहमदनगरमध्ये 1, अमरावतीत 1 आढळले आहेत. सध्या या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे मंत्री सावंत यांनी स्पष्ट केले.

ऑक्सिजनचा साठा :महाराष्ट्रात 523 ऑक्सिजन प्लांट आहेत. 552 मेट्रीक टन ऑक्सिजन निर्मिती करु शकतो. एकूण सिलेंडर 370 एमएलडी लिक्विड ऑक्सिजन टॅंक आहे. जेम्बो सिलेंडर 56 हजार 551, छोटे सिलेंडर 20 हजार, ड्युरा सिलेंडर एक हजार आहेत. उपचारासाठी कोविड रुग्णालय 1588 आहेत. आय सोल्युशन खाटा 51 हजार 365, ऑक्सिजन बेड 49 हजार 396, आयसीयू बेड 14 हजार 395, व्हेटींलेटर 9 हजार 236 इतके आहेत.

आतापर्यंतचे लसीकरण

पहिला डोस - 9 कोटी 16 लाख 67 हजार 928
दुसरा डोस - 7 कोटी 66 लाख 23 हजार 350
बुस्टर डोस - 96 लाख 93 हजार 851

एन्फ्यूएन्जाची आकडेवारी :एन्फ्यूएन्जाचे संशयीत रुग्ण 3 लाख 11 हजार 192 इतके आहेत. त्यामध्ये बाधित रुग्ण एच1एन1 चे 117 आणि एच3एन2 चे बाधित रुग्ण 249 इतके रुग्ण आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेले 160 रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये एच1एन1 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या तीन असून एच3एन2 मुळे एकाचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने सादर केलेल्या निवदेनात नमूद आहे.

हेही वाचा :Nitesh Rane: लँड जिहादच्या माध्यमातून हिंदू समाज कमी करण्याचा घाट - नितेश राणे

ABOUT THE AUTHOR

...view details