बीकेसीतील दुसऱ्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये गंभीर रुग्णांवर उपचार: 100 आयसीयू बेड
रुग्णालयालगत क्रिटिकल अर्थात गंभीर रुग्णांसाठी 1000 बेडच्या रुग्णालयाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसातच हे काम पूर्ण होईल, असे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. दरम्यान या रुग्णालयात 100 आयसीयू बेड असणार आहेत.
मुंबई -मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) बीकेसी एमएमआरडीए मैदानात 1008 बेडचे रुग्णालय नॉन क्रिटिकल रुग्णांसाठी तयार करण्यात आले आहे. तर आता याच रुग्णालयालगत क्रिटिकल अर्थात गंभीर रुग्णांसाठी 1000 बेडच्या रुग्णालयाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. पुढच्या काही दिवसातच हे काम पूर्ण होईल, असे एमएमआरडीएकडून सांगितले जात आहे. दरम्यान या रुग्णालयात 100 आयसीयू बेड असणार आहेत.
मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य सरकारने एमएमआरडीएला बीकेसीत कोविड रुग्णालय उभारण्यास सांगितले. त्यानुसार 15 दिवसाच्या आत एमएमआरडीएने हे रुग्णालय उभारत पालिकेला रुग्णालय हस्तांतरितही केले आहे. या रुग्णालयात सौम्य रुग्णांवर उपचार होणार आहेत. तर दुसरीकडे रुग्ण वाढतच असल्याने सरकारने इथेच 1000 बेड चे आणखी एक रुग्णालय उभारण्यास एमएमआरडीएला सांगितले. त्यानुसार आता या कामाला सुरुवात झाली असून कामाने वेग पकडला आहे.
दुसऱ्या रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार होणार असल्याने हे रुग्णालय अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे पालिकेच्या कोविड रुग्णालयाचा ताण कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, या रुग्णालयात 100 आयसीयू बेड असणार आहेत. तर उर्वरित 900 बेड ऑक्सिजन-नॉन ऑक्सिजन असे असणार आहेत. पहिले रुग्णालय 15 दिवसाच्या आत बांधून पूर्ण झाल्याने आता हे रुग्णालय ही कमीत कमी कालावधीत बांधण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. जेणेकरून रुग्णसेवा येथे लवकर सुरू होईल.