मुंबई - मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. पालिकेने बेड रिक्त असल्याचा दावा केला असला तरी गेल्या वर्षी प्रमाणेच पुन्हा रुग्णांना बेडसाठी वणवण करावी लागत आहे. विक्रोळी येथील गंगुबाई यादव या वयोवृद्ध महिला रुग्णाला तब्बल साडे नऊ तासानंतर बेड उपलब्ध झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे बेड रिक्त असल्याचा पालिकेचा दावा फोल असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने अनेक शिवसैनिक, नगरसेवक मुंबईच्या महापौरांना फोन करत असल्याने महापौरांनी वैतागून आपला फोन बंद करून ठेवला असल्याचे बोलले जात आहे.
बेडसाठी ९ तासांहून अधिक वेळ -
विक्रोळीतील येथील रहिवासी असलेल्या गंगुबाई यादव या ६५ वर्षीय वयोवृद्ध महिलेला ताप आल्याने स्थानिक रुबी क्लिनिकमध्ये उपचारासाठी भरती केले होत्या. त्यांची कोरोना चाचणी केली असता शुक्रवारी त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजन बेडची गरज होती. त्यांचा मुलगा विनय यादव शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून प्रयत्न करत होता. महापालिकेच्या भांडुप एस वॉर्ड येथे वारंवार संपर्क केल्यावर मुलुंड जम्बो कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नसल्याने त्यांना बांद्रा बिकेसी येथील कोविड सेंटरमध्ये बेड उपलब्ध करून देण्यात आला. मात्र येथील डीन डॉ. ढेरे यांच्याकडून होकार मिळत नसल्याने रुग्णाला दाखल केले जात नव्हते.
अखेर विनय यांनी सायंकाळी ६ वाजल्यानंतर स्वतःच बीकेसीमधील जम्बो कोविड सेंटर गाठले. तिथे उसळलेली गर्दी पाहून त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. तरीही प्रचंड धडपड केल्यानंतर सायंकाळी ७ वाजता नोंदणी करून बेड उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. पालिकेने या रुग्णाला रुग्णवाहिका नसल्याचे सांगितल्याने अखेर खासगी रुग्णवाहिका करून आईला विक्रोळीवरून यादव कुटुंबाने बीकेसी जम्बो कोविड सेंटर गाठले. मात्र रात्री ९.३० वाजले तरी रुग्णास भरती करण्याची प्रक्रिया संपली नव्हती. एका रुग्णाला ९ तासांहून अधिक काळ ऑक्सिजन बेडसाठी वाट पाहावी लागत असल्याचा हा प्रकार समोर आल्याने पालिकेचा बेड उपलब्ध असल्याचा आणि बेड वाढवले असल्याचा दावा फोल असल्याचे समोर आले आहे.
महापौर नॉट रिचेबल -
याबाबत महापौरांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन केला असता सतत त्यांचा फोन बंद लागला. महापौरांच्या एका जवळच्या पदाधिकाऱ्याला विचारणा केली असता, त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर या माहितीस दुजोरा दिला आहे. संबंधित पदाधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईतील बहुतांश वॉर्डमधून नगरसेवक आणि बड्या पदावरील कार्यकर्ते कोरोना रुग्णांना बेड हवा असल्याने फोन करत आहेत. परिणामी, काम करण्यास वेळच मिळत नसल्याने महापौरांनी वैतागून फोन बंद केलेला आहे. तसेच ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची चणचण भासत असल्याचे फोन सर्वात अधिक असल्याचेही संबंधित पदाधिकाऱ्याने सांगितले.
शिवसेना नेत्याचेही हाल -
मुंबई महापालिकेत बड्या पदावर असलेल्या एका शिवसेना नेत्यानेही बेड्सची चणचण असल्याचे मान्य केले. नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित शिवसेना नेत्याने सांगितले की, माझ्या स्वतःच्या बहिणीला भरती करण्यासाठी बेड उपलब्ध नाही. यावरून पालिका प्रशासनाचा दावा फोल असल्याचे समोर येत आहे.
आयसीयू, ऑक्सिजन बेड कमी -
आयसीयू बेड्सची कमतरता भासत आहे. जम्बो कोविड सेंटरमध्ये सर्वसाधारण रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत. मात्र ज्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे, अशा रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन आणि आयसीयू बेड्सची कमतरता आहे. आयसीयूसाठी लागणारा वैद्यकीय कर्मचारी व अधिकारी वर्ग कमी पडत आहे. अद्याप मृत्यूदर कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केले आहे. बेड्सची संख्या वाढवली जात आहे असे या अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा -चिंताजनक! मुंबईत महिनाभरात कोरोनाचे ४६ हजार सक्रिय रुग्ण वाढले
हेही वाचा -धारावीतील कोरोनाला एक वर्ष पूर्ण, आतापर्यंत ५ हजार रुग्णांची नोंद, ६९४ सक्रिय रुग्ण