मुंबई :प्रसिद्ध डीजे शो डान्सर गौतमी पाटील डान्सच्या मार्फत अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या लावणीच्या कार्यक्रमांना चाहते तुफान गर्दी करतात. तिच्या नृत्यावर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमीवर अश्लील कृत्य करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. अशातच आता तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
जाणून घ्या गौतमी पाटीलबद्दल :26 वर्षीय गौतमीने आपल्या दिलखेच अदांनी आणि दमदार नृत्याने सर्वांनाच वेड लावले आहे. गौतमीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अनेक कार्यक्रमासाठी गौतमीला लावणी सादर करण्यासाठी बोलवतात. कार्यक्रमासाठी गौतमीला चांगले मानधन मिळते. गौतमी पाटीलला प्रसिद्ध लावणी कलाकार म्हणून ओळखले जाते. मात्र गौतमीने एका मुलाखतीत सांगितले की, ती लावणी कलाकार नसून डीजे शो डान्सर आहे. गौतमी लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'घुंगरु' असे तिच्या आगामी सिनेमाचे नाव आहे. या सिनेमाचे शूटिंग महाराष्ट्रासह परदेशातदेखील झाले आहे.
गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी : मिरज तालुक्यातील बेडग येथे एका सत्कार कार्यक्रमावेळी गौतमी पाटीलच्या लावणी दरम्यान प्रेक्षकांनी धुडगूस घातल्याचा प्रकार घडला होता. उपस्थित प्रेक्षक अक्षरशः शाळेच्या छतावर थिरकले होते. तसेच झाडाच्या फांद्याही बसून मोडून टाकल्या होत्या. मिरज तालुक्यातील बेडग येथील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा येथे पटांगणात आयोजित लावणी कार्यक्रम प्रसंगी अमाप गर्दी जमली होती.
अश्लील डान्स करत असल्याचा आरोप : बेडग येथील एका मंडळाच्यावतीने वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ठ सेवा बजावणाऱ्या आणि बेडग गावाचे नाव देशात गाजविणाऱ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नृत्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर नृत्य पाहण्यासाठी गावासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने प्रेक्षक दाखल झाले होते. यामुळे शाळेच्या पटांगण भरून गेले होते. यावेळी उत्साही प्रेक्षकांनी छतावरच नृत्याचा ठेका धरला होता. ज्यामध्ये कौलांचा चुराडा झाला. यामुळे तार जाळीच्या कंपाऊंडचेही नुकसान झाले. प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमीवर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. आता त्यांच्या तक्रारीची दखल घेत सातारा न्यायालयाने गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा :तुम्हा बघून काळीज... लावणीच्या कार्यक्रमात शाळेच्या छतावर प्रेक्षकांचा धुडगूस