मुंबई- पालघरच्या घटनेनंतर पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लीम नाही, असे सांगणारे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्परतेने गुन्हेगारांची यादी जाहीर केली, त्याच तत्परतेने या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोण कोण आहेत? व ते कोणाशी संबंधित आहेत? त्यांचे फोटो आणि नाव जनतेसमोर जाहीर करावी, असे आव्हान विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य काशीराम चौधरी, पंचायत समिती सदस्य सीताराम चौधरी, कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते सुनिल रावते, रामदास असारे यांचा समावेश आहे. यांचीही नावे गृहमंत्र्यांनी जनतेसमोर जाहीर केल्यास यामध्ये कोणाचा हात आहे हे स्पष्ट होईल, असेही दरेकर म्हणाले.
'पालघर हत्या प्रकरणात राष्ट्रवादीसह कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींची नावे जाहीर करा'
भगवी वस्त्रे रक्ताने लाल झाली आहेत त्याचे काय? भगव्यावर झालेला हा लाल रक्ताचा हल्ला भगवी विचारधारा घेऊन राज्यकारभार करणाऱ्यांना आता धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणारा वाटतो. कारण खुर्ची ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेपेक्षा मोठी व महत्त्वाची ठरल्याचे दिसत आहे, अशी टीकाही दरेकर यांनी केली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होते, ते राज्य सरकारला चालते. मात्र, भाजपने अथवा सामान्य जनतेने सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका केली, तर पोलीस त्यांच्यावर गुन्हे दाखल करीत आहेत. पण ही सूडाची भावना योग्य नाही, असेही ते म्हणाले.
राज्यात विलगीकरणाची अवस्थादेखील आज दयनीय आहे. विलग ठेवलेल्या संशयितांना शौचालय आणि खाण्यापिण्याची योग्य व्यवस्था नाही. तसेच त्याची नीट तपासणीही होत नाही. त्यामुळे विलगीकरणात ठेवलेले रुग्ण अतिशय त्रस्त झाले आहेत. त्याकडे सरकारने गांभीर्याने व तत्काळ लक्ष द्यावे, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.