मुंबई :मंत्रालय सहकारी पतसंस्थेच्या माजी संचालकानं संस्थेची 63 लाख 33 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. माजी संचालकानं बोगस हजेरी दाखवून जवळचे कर्मचारी, संचालकांना सुमारे 25 लाख 13 हजार 279 रुपये अदा केले आहेत. तसंच, पतसंस्थेला निवडणुकीवर खर्च करण्याचा अधिकार नसतानाही माजी संचालकांनी सोसायटीचे 36 लाख रुपये बेकायदेशीरपणे निवडणुकीसाठी वापरले आहेत.
नोंदणीमध्ये केला बदल : विशेष म्हणजे माजी संचालकानं एक लाख साठ हजार रुपयांचा आपला व्यक्तिगत आयकर सोसायटीच्या खात्यातून भरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील आकाशवाणी केंद्र जवळील मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य शाखेत हा अपहार झाला आहे. या शाखेमध्ये कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी स्वयंचलित बायोमेट्रिक यंत्र आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद केली जाते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून अमित खांगळ यांनी एक जून ते 30 जून 2022 या कालावधीतील नोंदणीमध्ये बदल केलाय. यामध्ये 23 अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम केल्याच्या नोंदी करण्यात आल्या, असा आरोप विद्यमान संचालक भाऊसाहेब पठाण यांनी केला आहे.
नोंदींना मान्यता देण्यासाठी ठराव : तसंच माजी संचालका रा.गो तावडे, व्यवस्थापक सुशील तावडे, उपव्यवस्थापक सुनील चव्हाण यांनी जून 2022 मध्ये संस्थेच्या मुख्यालयात अतिरिक्त काम केल्याच्या नोंदी केल्या होत्या. या नोंदींना मान्यता देण्यासाठी माजी संचालकांनी ठराव केला होता. या ठरावाला सूचक म्हणून मो. बा. गोरे, अनुमोदक म्हणून प्र. का. सकपाळ यांच्या सह्या दाखवण्यात आल्या आहेत. मात्र, सकपाळ 'हे' ठरावाच्या दिवशी गैरहजर होते, अशी माहिती संस्थेचे लेखापरीक्षक मोहन मोहिते यांनी सहकार आयुक्तांना दिली आहे.