महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणथळ ठिकाणांच्या संवर्धनासाठी पालिकेने धोरण ठरवावे - शितल म्हात्रे - फ्लेमिंगो

मुंबई व परिसरात असलेल्या पाणथळ ठिकाणे शोधून त्यांचे संवर्धन करावे, अशी ठरावाची सूचना विधी समितीचे अध्यक्ष शितल म्हात्रे सभागृहात मांडली आहे.

फ्लेमिंगो
फ्लेमिंगो

By

Published : Feb 29, 2020, 1:10 PM IST

मुंबई- मुंबई व परिसरात असलेल्या पाणथळ ठिकाणी हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो आणि इतर पक्षी येत होते. त्या ठिकाणी अनेक महिने त्यांचा मुक्काम असायचा. मात्र, मुंबईत अनेक ठिकाणी बांधकामे झाल्याने पाणथळ जागांची संख्या कमी झाली आहे. यामुळे पक्षांनी पाठ फिरवली असून अशा पाणथळ ठिकाणे शोधून त्यांचे संवर्धन करण्यासाठी पालिकेने धोरण ठरवावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समितीच्या अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केली आहे. या मागणीसाठी म्हात्रे यांनी पालिकेच्या सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे.

बोलताना शितल म्हात्रे

गुजरातच्या कच्छमधून हजारो फ्लेमिंगो पक्षी दरवर्षी मुंबईमधील गोराई, मालाड, शिवडी, भांडुप, उदंचन केंद्र आदी ठिकाणी तसेच ठाणे नवी मुंबईमधील वाशीच्या खाडीकिनारी येतात. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात स्थलांतर करून आलेले हे पक्षी साधारण सहा ते सात महिने या ठिकाणी वास्तव्य करून पावसाळ्यापूर्वी पुन्हा आपल्या मायदेशी परतात. फ्लेमिंगोसह या ठिकाणी इतर जातीचे पक्षी स्थलांतरित होतात.

खाडीलगत असणारा दलदलीचा परिसर हा स्थलांतरित पक्ष्यांना पोषक खाद्य पुरविण्यासाठी समृद्ध आहे. दलदलीच्या परिसरात लहान मासे, नील आणि हरित शेवाळ, जलकीटकांच्या अळ्या, एकपेशी वनस्पती हे खाद्य विपुल प्रमाणात मिळत असल्याने स्थलांतरित पक्ष्यांसोबत फ्लेमिंगो पक्षी या ठिकाणी स्थलांतर करतात.

मात्र, गेल्या काही वर्षांत खाडीलगत अनेक ठिकाणी बांधकामे करण्यात आली आहेत. भिंती बांधण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी ढिगारे आणि माती टाकून भराव टाकण्यात आला आहे. भराव टाकल्याने, भिंतीचे व इतर बांधकाम केल्याने पाणथळ जागा कमी झाल्या आहेत. यामुळे फ्लेमिंगो किंवा इतर येणाऱ्या स्थलांतरित पक्षांची संख्याही कमी झाली आहे.

फ्लेमिंगो किंवा इतर पक्षांना पाणथळ जागा महत्त्वाच्या असल्याने त्यांचे संवर्धन पालिकेने करावे, त्यासाठी मुंबईमध्ये अशी पाणथळ ठिकाणे शोधून काढावीत आणि त्यासाठी धोरण ठरवावे, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी केली आहे. या मागणीसाठी म्हात्रे यांनी पालिकेच्या सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या सभागृहात ही ठरावाची सूचना मंजुरीसाठी येणार आहे.

हेही वाचा -मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंग यांची वर्णी

ABOUT THE AUTHOR

...view details