महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महापालिका आरोग्य विभागाची श्वेतपत्रिका काढा, नगरसेवकांची मागणी - मुंबई बातमी

आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांना योग्यप्रकारे सेवा मिळत नाही. पालिकेच्या आरोग्य सेवांबाबत मुंबईकरांमधील विश्वासार्हता गमावली जात आहे. महापालिकेने सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबध्द आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी महापालिका सभागृहात 66 ब अन्वये चर्चा घडवून आणली.

Municipal Health Department
मुंबई महापालिका

By

Published : Dec 11, 2019, 3:22 AM IST

मुंबई- महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी करोडो रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरीही रुग्णांना आवश्यक असलेली औषधे रुग्णालयात मिळत नाहीत. सार्वजनिक आरोग्य खाते, मध्यवर्ती खरेदी खाते, रुग्णालय व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागतो, अशी टीका करत पालिकेच्या आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढत आरोग्य विभागाची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी केली.

तर या मागणीवर औषधे संपण्याच्या 3 ते 4 महिन्यापूर्वीच निविदा काढल्या जातील. औषधांचा तुटवडा जाणवणार नाही, असे स्पष्टीकरण अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिले.

अश्रफ आझमी, काँग्रेस नगरसेवक

हेही वाचा - राजावाडी रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग रात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी

मुंबई महापालिका परवडणाऱ्या दरात नागरिकांना आरोग्य सेवा पुरवते. अर्थसंकल्पात त्यासाठी दरवर्षी कोट्यवधीची भरीव तरतूद केली जाते. रुग्णांना तरीही बाहेरुन औषधे खरेदी करावी लागतात. महासभेत याबाबत नगरसेवक वारंवार आवाज उठवतात. परंतु, आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांना योग्यप्रकारे सेवा मिळत नाही. पालिकेच्या आरोग्य सेवांबाबत मुंबईकरांमधील विश्वासार्हता गमावली जात आहे. महापालिकेने सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबध्द आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करत काँग्रेसचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी महापालिका सभागृहात 66 ब अन्वये चर्चा घडवून आणली. सर्वपक्षीय नगरसेवकांनी यामुद्द्यावरुन प्रशासनाला धारेवर धरले.

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पाठिंबा देत 'आपली चिकित्सा'अंतर्गत करण्यात येणार्‍या चाचणीची वेळ सकाळी 10 ऐवजी 8 करावी. औषधांचा निविदा साठा संपण्याच्या 6 महिन्यांपूर्वी नव्याने निविदा काढाव्यात, अशी मागणी केली.

हेही वाचा - मध्य रेल्वेवरील पहिली एसी लोकल चालवण्याचा मान महिला मोटरमनला; लवकरच येणार रुळावर

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषधांचा किती साठा आहे, याची जाणीव तेथील आरोग्य अधिकाऱ्यांना असते. मात्र, त्यांच्याकडून औषधखरेदीसाठी जाणीवपूर्वक विलंब लावला जातो. खासगी मेडिकलवाल्यांचा फायदा व्हावा असाच त्यामागे हेतू असतो. यात डॉक्टर आणि खासगी मेडिकलवाल्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केला आणि आरोग्य विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली.

पालकेचा कारभार सॅप प्रणालीवर चालतो. त्यामुळे औषधांच्या साठ्याबाबतची माहिती संगणकावर मिळते. तरीही औषधांच्या खरेदीसाठी निविदा मागविल्या जात नाहीत. जाणीवपूर्वक आरोग्य विभाग विलंब करत आहे, असा गंभीर आरोप भाजपचे नगरसेवक अभिजीत सामंत यांनी केला.

सर्वपक्षीय नगरसेवकांनी रुग्णालय व्यवस्थापनातील त्रुटींवर आक्षेप नोंदवला. तर आरोग्य खात्यातील त्रुटी सुधारण्याचे आदेश महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाला दिले. तसेच सदस्यांनी सुचवलेल्या सुचनांचा विचार करुन त्यात अमुलाग्र बदल करावा, असे आदेशही महापौरांनी दिले. दरम्यान, साठ्याच्या उपलब्धतेनुसार औषध खरेदीच्या निविदा काढण्याच्या सूचना केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details