मुंबई- झोपडपट्टीतील गल्ल्यांमधून टाकला जाणारा कचरा नाल्यात जाऊन हे नाले कचऱ्याने भरतात. त्यामुळे मुंबईत अनेकवेळा पाणी भरते. ही समस्या सोडवण्यासाठी गल्ल्यांमधील गटारांवर जाळ्या बसवण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे नगरसेवक आकाश पुरोहित यांनी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. अशा जाळ्या बसवल्यास पालिका कर्मचाऱ्यांच्या सफाईच्या वेळेचीही बचत होणार असल्याचे पुरोहित यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -पीएमसी बँकेला राज्य सरकार मदत करणार असेल तर त्यांचं स्वागत - किरीट सोमय्या
मुंबईमधील ६० टक्के नागरिक झोपडपट्टीत राहतात. झोपडपट्ट्यांमधील नागरिक गल्ल्यांमधील गटारांमध्ये कचरा टाकतात. हा कचरा पुढे नाल्यांमध्ये जातो. त्यामुळे नाले कचऱ्याने भरतात. कचरा आणि गाळ यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी नाल्याच्या बाहेर येऊन परिसरात पाणी साचते. प्रसंगी मुंबई तुंबते आणि शहर ठप्प होते. शहर ठप्प होण्यापासून वाचवण्यासाठी गल्ल्यांमधून नाल्यांमध्ये जाणारा कचरा रोखणे आवश्यक आहे. त्यासाठी झोपडपट्टीमधील नाल्यांवर तसेच हाऊस गल्ल्यांमधील कचरा गटारात जाऊ नये म्हणून त्यावर जाळ्या बसवण्यात याव्यात, अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे.
मुंबईमधील नगरसेवक झोपडपट्टीतील गल्ल्यांमध्ये लाद्या बसवणे, फूटपाथ बनवणे यावर मोठ्या प्रमाणात आपला निधी खर्च करतात. त्यामधून म्हणावे असे काहीही साध्य होत नाही. झोपडपट्टीमधील गटारांवर पातळ जाळ्या बसवल्यास कचरा या जाळ्यांमध्ये अडकेल आणि पाणी गटारांमध्ये जाईल. या जाळ्या स्वस्त असल्याने मुंबईमधील सर्वच नगरसेवकांनी आपल्या विभागात अशा जाळ्या बसवल्यास नाल्यांमध्ये जाणारा कचरा रोखता येऊ शकतो. यामुळे गटारे आणि नाले स्वच्छ राहतील. प्रसंगी शहरात नाले तुंबणार नाहीत, असे पुरोहित यांनी म्हटले आहे. याबाबतची ठरावाची सूचना त्यांनी पालिका सभागृहात मंजुरीसाठी मांडली आहे.