मुंबई - कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दीत न जाण्याचे आवाहन पालिका व राज्य सरकारकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्चिम येथील भाज्यांचा घाऊक बाजार 29 मार्चपासून बंद होणार आहे. हा बाजार आता दादरसह घाटकोपर, दहिसर, मुलुंड, वांद्रे या ठिकाणी विभागून सुरू होईल. यामुळे सध्या होणारी गर्दी कमी करण्यास येईल, असे पालिकेचे म्हणणे आहे.
गर्दी टाळण्यासाठी दादरच्या घाऊक भाजीबाजाराचे विभाजन - कोरोना प्रसार
कोरोना विषाणू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी गर्दीत न जाण्याचे आवाहन पालिका व राज्य सरकारकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी दादर पश्चिम येथील भाज्यांचा घाऊक बाजार 29 मार्चपासून बंद होणार आहे.
दादर पश्चिम येथे सेनापती बापट मार्गावर भाजी मार्केट आहे. याठिकाणी घाऊक स्वरुपात भाजी स्वस्त मिळत असल्याने मुंबईच्या कानाकोपऱ्यातील व्यापारी आणि ग्राहक भाजी घेण्यासाठी येथे गर्दी करतात. सध्या कोरोनाने थैमान घातले असताना गर्दी टाळणे हाच उपाय आहे.
भाजी विक्रेत्यांकडे होणारी गर्दी कमी करण्यासाठी घाटकोपर ते माटुंगा येथील व्यापाऱ्यांसाठी सोमय्या मैदान येथे, वांद्रे ते गोरेगाव येथील व्यापाऱ्यांसाठी एमएमआरडीए एक्झिबिशन मैदान येथे, मुलुंड ते घाटकोपर येथील व्यापाऱ्यांसाठी मुलुंड जकात नाका येथे, दहिसर ते मालाड येथील व्यापाऱ्यांसाठी दहिसर चेक नाका येथे तर मुंबई शहर विभागातील व्यापाऱ्यांसाठी सध्या दादर येथे सुरू असलेल्या भाजी मार्केटच्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था पुढील आदेश मिळेपर्यंत सुरू राहणार आहे, असे पलिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.