"पोलिसांवर होणाऱ्या हल्ल्याने त्यांचे मनोबल खचल्यास कोरोनोची परिस्थिती हाताळणे अवघड होईल"
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढायला हवे आणि पोलिसांना आता अशा प्रवृत्तीपासून संरक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता गृहखाते पोलिंसावरील हल्ले रोखण्यासाठी काय करणार, असा सवाल दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे उपस्थित केला आहे.
मुंबई - कोरोनोच्या संकटात महाराष्ट्र सापडला आहे. कोरोनासारख्या कठिण परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस बांधव दिवस रात्र करित आहेत. मात्र, कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांवर गेल्या काही दिवसात हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांवर असे हल्ले वाढत गेल्यास कोरोनोची परिस्थिती हाताळणे अवघड होईल असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढायला हवे आणि पोलिसांना आता अशा प्रवृत्तीपासून संरक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता गृहखाते पोलिंसावरील हल्ले रोखण्यासाठी काय करणार, असा सवाल दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे उपस्थित केला आहे.
नाशिक, मानर्खुद भिवंडी, पैठण येथील पोलिंसावरील हल्ल्यांच्या घटना पुन्हा एकदा गृहखात्याचा नाकर्तेपणा सिद्ध करणाऱ्या आहेत. कोरोनाच्या लढाईत दिवसरात्र कर्तव्य बजाविणाऱ्या १५९ पोलिसांवर आतापर्यंत हल्ले झाले आहेत. हल्लेखोर विशिष्ट प्रवृतीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा हल्याने पोलिसांचे मनोबल खचल्यास कोरोनाग्रस्त परिस्थिती हाताळता येणार नाही. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री आता पोलिंसांवर हल्ला करणाऱ्या या प्रवृत्तींना आळा कसा घालणार आणि पोलिसांचे रक्षण कसे करणार असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.