मुंबई :कोरोना या आजाराच्या संसर्गाने 2019-20 साली संपूर्ण जग हादरून गेले होते. मुंबईमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात याचा प्रसार झाल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले. लोकांना काहीच सुचत नव्हते, लोक घरामध्ये बंदिस्त झाली होती. परंतु, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मदतीसाठी धावून आले ते कोरोनायोद्धा. मग ते डॉक्टर असतील, नर्सेस असतील, कंपाऊंडर असतील, पोलीस असतील किंवा समाजसेवक असतील. विविध प्रकारे या करोना योद्ध्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दिवस-रात्र एक करून लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, सरकारने अद्याप याची दखल घेतली नाही आहे. असाच एक अभिजीत जाधव हा कोरोनायोद्धा आजही सरकार दरबारी दुर्लक्षित आहेत.
लाज बाळगली नाही :अभिजीत जाधव हा मुंबईतील तरुण कोरोना येण्याच्या अगोदर एका ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर म्हणून हॉटेल बुकिंगचे काम करीत होता. २०१९ ला कोविड आला व १९ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागले. यादरम्यान अभिजीतची नोकरी गेली. त्याने मासळी विकणे, भाजीपाला विकणे, मिळेल ती काम तो करीत गेला. घरे चालवण्यासाठी कुठल्याही पद्धतीची लाज बाळगली नाही. घर चालवण्यासाठी तो पडेल ते काम करीत राहिला. कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर अभिजीतने कर्ज काढून स्वतःच छोटसे गॅरेज सुरू केले. परंतु, १५ मार्च २०२१ ला पुन्हा लॉकडाऊन लागले. त्यामध्ये त्याला फार मोठा फटका बसला.
एनएसजी सेंटर येथे कामाला लागला :गॅरेजचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत. अशातच मुंबईमध्ये जी साऊथ, वरळी येथे कोविड योद्ध्यांसाठी भरती सुरू झाली. त्या प्रसंगी कोरोना उच्च स्तरावर होता. परंतु, अशा परिस्थितीत स्वतःच्या व घरच्यांच्या जीवाची पर्वा न करता मुंबई, वरळी येथील एनएसजी, सेंटर येथे अभिजीत कामाला लागला. आपण मरणाच्या दारातच काम करीत आहोत, असे त्याला वाटत होते. त्याने कधीच स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.
आजपर्यंत अभिजितला एकही मोबदला नाही :कोरोना पेशंटबरोबर त्यांना राहायला लागायचे. एमआरआयसाठी कोरोना पेशंटला बाहेर घेऊन जाणे, बारा-बारा तास पीपीई किट घालून काम करणे, अशामध्ये २९ एप्रिल २०२१ला कोरोनायोद्धा म्हणून भरती झालेल्या अभिजीतने १० ऑगस्ट २०१९ पर्यंत काम केले. सुरुवातीला एनएससी वरळी येथे काम केल्यानंतर तिथले ऑक्सिजन प्लांट बंद झाल्याने नंतर त्यांना पोद्दार हॉस्पिटल वरळी येथे शिफ्ट करण्यात आले. परंतु, आजतागायत अभिजितला काही एक मोबदला भेटला नाही.