मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. देशात कोरोनाचे सर्वात जास्त रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात दीड दिवसात कोरोनाचे 100 रुग्ण वाढले असल्याचे राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा आता 320 वर पोहोचला आहे. त्यापैकी 39 जण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, ही आकडेवारी राज्याच्या चिंतेत वाढ करणारी आहे.
हेही वाचा-कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांवर सरकार आणि पालिकेचे लक्ष
सोमवारी रात्रीपर्यंत महाराष्ट्रात 220 रुग्ण होते. त्यात मंगळवारी सकाळी 10 तर रात्री 72 रुग्ण वाढल्याची नोंद झाल्याने मंगळवारी कोरोनाचा आकडा 302 वर पोहोचला. त्यात आज सकाळी आणखी 18 रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या आता 320 झाली आहे. या आकडेवारीवरुन सोमवारच्या रात्रीनंतर महाराष्ट्रात 100 नवे रुग्ण आढळून आल्याचे समोर आले आहे. राज्यातील एकूण 320 रुग्णांपैकी आतापर्यंत 39 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनामुळे सोमवार पर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला होता. सोमवारी एका 80 वर्षीय वृद्धाचा मुंबईमधील फॉर्टीस रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच पुण्यात एका 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे मृतांची आकडेवारी 10 झाली होती. तर मंगळवारी पालघरमध्ये एका 50 वर्षीय तर मुंबईत एका 75 वर्षीय वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा आकडा 12 वर पोहचला आहे.
जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह रुग्णांचा तपशील-
मुंबई- 167, पुणे ( शहर व ग्रामीण भाग )-50, सांगली- 25, मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा- 36, नागपूर- 16, यवतमाळ- 4, अहमदनगर- 8, बुलढाणा-3, सातारा, कोल्हापूर- प्रत्येकी 2, औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक- प्रत्येकी 1, इतर राज्य- गुजरात 1.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज आठवा दिवस आहे.