मुंबई : कोरोना विषाणू हा संसर्गजन्य आजार आहे. तो रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या लोकांमध्ये पसरतो. 11 मार्च 2020 रोजी आढळून आलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विषाणूची लागण झाली. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाला होता. सुरुवातीला इमारतीमध्ये कोरोनाचे रुग्ण होते. त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून कोरोना झोपडपट्टीत पसरला. मुंबईमध्ये धारावी, वरळीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना पसरल्याने मुंबईकरांमध्ये भीती पसरली होती.
बेड्स कमी पडू लागले: मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने झाल्यानंतर रुग्णांचे मृत्यू होऊ लागले. सरकार मुंबई महापालिका आणि आरोग्य विभाग यांनी रुग्ण आणि रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाईन करण्यास सुरुवात केली. महापालिकेची रुग्णालय सरकारी रुग्णालय यामधील बेड्स कमी पडू लागल्याने जम्बो कोविड सेंटर उभारली. त्यामध्ये लाखो रुग्णांवरती उपचार करण्यात आले.
या राबवल्या उपायोजना: मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू पसरू नये म्हणून, डॉक्टर आपल्या दारी, ट्रेसिंग टेस्टिंग ट्रीटींग आणि ट्रीटमेंट, धारावी पॅटर्न, मुंबई पॅटर्न याची अंमलबजावणी केली. रुग्णालयात रात्रीचे मृत्यू होत असल्याने रुग्णांना बेडवरतीच शौचाचे भांडे देण्यात आले. यामुळे शौच आणि मूत्रालयात जाताना चक्कर येऊन मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले. मुंबई महापालिकेने राबवलेल्या मुंबई पॅटर्नची दखल देशभरात आणि जगभरात घेण्यात आली आहे.