मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास ज्या विभागात आहे, त्या एच पूर्व विभागातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. कारण मंगळवारी वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ या परिसरात केवळ 19 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. या भागातील रुग्ण दुपटीचा वेग 52 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.
एप्रिलमध्ये मातोश्री निवासस्थानालगतच्या एका चहावाल्याला कोरोना झाला. याच चहावाल्याकडे मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस चहा पिण्यासाठी जात होते, त्यामुळे खळबळ उडाली होती. हा परिसर सील करत अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कलानगर परिसरात एकही रूग्ण आढळलेला नाही. तर एच पूर्व विभागातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वरनगर या परिसरातही कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती एच पूर्वचे वार्ड ऑफिसर ए. जी. खैरनार यांनी दिली आहे.